डान्स बारसाठी मतदान घ्या
By admin | Published: March 20, 2016 02:49 AM2016-03-20T02:49:23+5:302016-03-20T02:49:23+5:30
एखाद्या परिसरातील नागरिकांना विशेषत: महिलांना दारूचे दुकान नको असल्यास मतदानाद्वारे त्याचा निर्णय घेतला जातो;...
नागपूर : एखाद्या परिसरातील नागरिकांना विशेषत: महिलांना दारूचे दुकान नको असल्यास मतदानाद्वारे त्याचा निर्णय घेतला जातो; त्याचप्रमाणे शहरात डान्स बार हवे की नाही, यासाठीसुद्धा मतदान घेण्यात यावे, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून पुढे आली आहे.
नागपुरात काही डान्स बार मालकांनी परवान्यासाठी अर्ज केले आहेत. त्यांच्या अर्जावर विचार केला जात आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरात डान्स बार सुरू होण्याची शक्यता बळावली आहे. परंतु शहरातील नागरिकांचा मात्र याला प्रचंड विरोध आहे. नागरिकांची ही भावना लक्षात घेऊन लोकमतनेसुद्धा हा विषय लावून धरला आहे. यासंदर्भात शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असता त्या सर्वांनीच डान्स बारला विरोध केला आहे. आता यात सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकही सहभागी झाले आहेत. नागरिकांचा विशेषत: महिलांचा याला प्रचंड विरोध आहे.
मनोरंजनासाठी डान्स बारच का?
नागपूर : शहरात डान्स बारची गरजच काय? डान्स बारमध्ये मनोरंजनाच्या नावाखाली बरेच काही सुरू असते. त्यातून आपण कोणता समाज घडविणार आहोत, याचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. नैतिक मूल्याची शिकवण देणारे सरकार सत्तेवर असताना डान्स बार कसा काय सुरू केला जातो, असा सवाल सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील यांनी केला.
नागरिकांना ठरवू द्या
नागरिकांना त्यांच्या शहरात काय हवे, काय नको, हे ठरविण्याचा अधिकार आहे. त्यांना डान्स बार हवा की नाही, हे कोण ठरवणार. हे ठरवण्याचा अधिकार त्यांनाच देण्यात यावा. यासाठी मतदान घेण्यास हरकत काय.
प्रकाश कुंभे ,
प्रदेशाध्यक्ष, रिपाइं
डान्स बार नकोच
शहरात डान्स बारची गरज नाही. आधीच शहरात गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यात डान्स बार सुरू झाल्यास गुन्ह्यात वाढ होईल. त्यामुळे डान्स बार नकोच.
ज्योती खोब्रागडे, सामाजिक कार्यकर्त्या
नागपूरची संस्कृतीच धोक्यात
डान्स बार सुरू होणे म्हणजे नागपूरची संस्कृतीच धोक्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जात-पात व पक्ष-भेद सोडून याचा विरोध व्हावा. सर्वांनी एकत्र यावे.
विजय पाटील, सामाजिक कार्यकर्ते
सध्या तरी कुठलेही धोरण नाही
एखाद्या वस्तीमध्ये दारूचे दुकान असेल आणि त्याला नागरिकांचा विरोध असेल तर मात्र मतदान घेण्याची पद्धत आहे. परंतु त्याचेही काही नियम आहेत. त्या परिसरातील नागरिकांची तशी मागणी असावी. त्यानंतर महिलांचे मतदान घेतले जाते. शहरात आतापर्यंत तरी डान्स बार नाही, त्यामुळे ते हटविण्यासंदर्भात सध्या तरी कुठलेही धोरण नाही.
-सचिन कुर्वे , जिल्हाधिकारी