मतदार जनजागृती एक्स्प्रेस नागपुरात : निवडणूक आयोगाचा अभिनव उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 08:27 PM2019-03-30T20:27:07+5:302019-03-30T20:33:18+5:30

‘कोई मतदाता ना छुटे, वोट करने अवश्य जाएँ’, ‘गो कॉल १९५०’ अशी माहिती देणारे पोस्टर्स शनिवारी पहाटे नागपुरात दाखल झालेल्या केरळ एक्स्प्रेसवर पाहून फलाटावर उपस्थित प्रवाशांनी रेल्वेगाडीसोबतच सेल्फी काढली. निवडणूक आयोग आणि भारतीय रेल्वेच्या या उपक्रमाचे कौतुक करीत ‘आपण मतदान करणारच’ असा संकल्प प्रवाशांनी केला.

Voter Janajagruti Express in Nagpur: The innovative venture of the Election Commission | मतदार जनजागृती एक्स्प्रेस नागपुरात : निवडणूक आयोगाचा अभिनव उपक्रम

मतदार जनजागृती एक्स्प्रेस नागपुरात : निवडणूक आयोगाचा अभिनव उपक्रम

Next
ठळक मुद्देलांब पल्ल्याच्या रेल्वेतून मतदार जनजागृतीकेरळ एक्स्प्रेसचे नागपुरात स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोई मतदाता ना छुटे, वोट करने अवश्य जाएँ’, ‘गो कॉल १९५०’ अशी माहिती देणारे पोस्टर्स शनिवारी पहाटे नागपुरात दाखल झालेल्या केरळ एक्स्प्रेसवर पाहून फलाटावर उपस्थित प्रवाशांनी रेल्वेगाडीसोबतच सेल्फी काढली. निवडणूक आयोग आणि भारतीय रेल्वेच्या या उपक्रमाचे कौतुक करीत ‘आपण मतदान करणारच’ असा संकल्प प्रवाशांनी केला.
लोकसभा निवडणूक २०१९ च्या निमित्ताने देशभरातील मतदारांनी १०० टक्के मतदान करावे, मतदानाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने निवडणूक आयोगाच्या पुढाकाराने आणि भारतीय रेल्वेच्या सहकार्याने संपूर्ण देशभरात रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. देशभरात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्यांवर मतदार जनजागृतीचे फलक लावून प्रवासी मतदारांपर्यंत प्रभावी संदेश पोहचविण्याचे कार्य सुरू झाले आहे. या मोहिमेचा शुभारंभ शुक्रवारी नवी दिल्ली येथे झाला. नवी दिल्ली स्थानकावरून २९ मार्च रोजी सकाळी ११.२५ वाजता सुटणाऱ्या नवी दिल्ली-त्रिवेंद्रम (गाडी क्र. १२६२६) या गाडीला वरिष्ठ निवडणूक उपायुक्त उमेश सिन्हा यांनी हिरवी झेंडी दाखवून रेल्वेच्या माध्यमातून मतदार जनजागृती मोहिमेचा शुभारंभ केला. या गाडीच्या संपूर्ण कोचवर मतदार जनजागृतीचे संदेश लावण्यात आले आहेत. निवडणूकसंबंधी कुठलीही माहिती जाणून घेण्यासाठी असलेला टोल फ्री क्रमांक १९५०, निवडणूक जनजागृतीसाठी देशाचे ऑयकॉन असलेले मुष्टियोद्धा मेरी कोम, क्रिकेट खेळाडू राहुल द्रविड यांचे मतदान करण्याविषयीचे संदेश यासह विविध माहिती देण्यात आली आहे.
दिल्लीहून निघालेल्या या गाडीचे आग्रा कॅन्ट, ग्वाल्हेर, झांशी, भोपाळ, इटारसी येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नागपूर रेल्वे स्थानकावर ही गाडी शनिवारी पहाटे ३.५० वाजता पोहचली. निवडणूक नोडल अधिकारी (नागपूर शहर) डॉ. रंजना लाडे, निवडणूक नोडल अधिकारी (नागपूर ग्रामीण) राजेंद्र भुयार, नागपूर रेल्वे स्थानक संचालक दिनेश नागदिवे, अमेनिटी सुपरवायझर प्रवीण रोकडे, उपस्थानक प्रमुख (व्यावसायिक) दत्तू गाडगे यांनी केरळ एक्स्प्रेसचे स्वागत केले. महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वतीने मतदान करण्याचा संदेश असलेले बॅनर्स आणि सेल्फी पॉईंट फलाटावर उभारण्यात आला होता. प्रवाशांनी सेल्फी पॉईंटसमोर आणि जनजागृतीचे फलक असलेल्या रेल्वेसमोर सेल्फी काढून सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांपर्यंत संदेश पोहचविण्याचा विश्वास यावेळी दिला. स्थानक संचालक दिनेश नागदिवे यांनी रेल्वे स्थानकावर निवडणूक काळात मतदानाचा संदेश ध्वनिक्षेपकावरून वेळोवेळी देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
पुढील प्रवासासाठी हिरवी झेंडी
पहाटे ४.१० वाजता नोडल अधिकारी डॉ. रंजना लाडे आणि नोडल अधिकारी राजेंद्र भुयार यांनी हिरवी झेंडी दाखवून जनजागृतीच्या पुढील प्रवासाकरिता रेल्वेला रवाना केले. यावेळी कपिलनगर उच्च माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र पुसेकर, शिक्षण विभागाचे विनय बगळे, विनीत टेंभुर्णे, रेल्वेचे आरोग्य निरीक्षक अरुण सेन, अगाथा फ्रान्सिस उपस्थित होते.
केरळ एक्स्प्रेसव्यतिरिक्त जम्मू-कन्याकुमारी हिमसागर एक्स्प्रेस, अहमदाबाद-कोलकाता हावरा एक्स्प्रेस, ओखा-गुवाहाटी एक्स्प्रेस या गाड्यांच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात येणार आहे.

Web Title: Voter Janajagruti Express in Nagpur: The innovative venture of the Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.