ग्रामपंचायत सदस्यांसाेबतच मतदारांनीही नाकारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:08 AM2021-02-24T04:08:17+5:302021-02-24T04:08:17+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : नरखेड तालुक्यातील नारसिंगी-नायगाव (ठाकरे) गट ग्रामपंचायतचे सरपंच कृष्णा उईके यांच्या विराेधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : नरखेड तालुक्यातील नारसिंगी-नायगाव (ठाकरे) गट ग्रामपंचायतचे सरपंच कृष्णा उईके यांच्या विराेधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव पारित केल्यानंतर यावर निर्णय घेण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या आदेशान्वये नारसिंगी येथे साेमवारी (दि. २२) मतदान घेण्यात आले. यात १,१२७ पैकी ४२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कृष्णा उईके यांच्या विराेधात २९९ मतदारांनी, तर समर्थनात केवळ ९० मतदारांनी मतदान केले. शिवाय ३२ मते अवैध ठरविण्यात आली. ग्रामपंचायत सदस्यांसाेबतच मतदारांनीही नाकारल्याने त्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले.
या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्यासाठी नारसिंगी येथे साेमवारी मतदान घेण्यात आले. त्यासाठी मतपत्रिकांचा वापर करण्यात आला. काेरम पूर्ण झाल्यावर सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. यात एकूण १,१२७ पैकी ४२१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुुपारी ३ वाजता मतमाेजणीला सुरुवात झाली. यात २९९ मतदारांनी सरपंच कृष्णा उईके यांच्या विराेधात, तर ९० मतदारांनी समर्थनात मतदान केले. शिवाय, ३२ मत अवैध ठरविण्यात आले.
कृष्णा उईके यांची सरपंचपदी थेट मतदारांमधून निवड झाली हाेती. मनमानी कारभार करीत असल्याचा ठपका ठेवत ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांच्या विराेधात ९ फेब्रुवारी राेजी अविश्वास ठराव सहा विरुद्ध एक मताने पारित केला. या अविश्वास ठरावावर अंतिम निर्णय घेण्यासाठी मतदान घेण्यात आले, अशी माहिती तहसीलदार डी. जी. जाधव यांनी दिली. या संपूर्ण प्रक्रियेचा अहवाल जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना सादर केला जाईल. त्यांच्या आदेशान्वये पुढील कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. पीठासीन अधिकारी तथा खंडविकास अधिकारी प्रशांत माेहाेड यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. पाेलीस उपनिरीक्षक राजेंद्र साेनवणे यांच्या नेतृत्वात पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला हाेता.
...
फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा
मतदान करण्यापूर्वी प्रत्येक मतदाराच्या शरीराचे तापमान नाेंदविण्यात आले हाेते. शिवाय हात सॅनिटाईज करून त्यांना आत प्रवेश देण्यात आला. त्यासाठी आराेग्य विभागाचे कर्मचारी व आशासेविकांची नियुक्ती केली हाेती. मात्र, मतदान करण्यासाठी मतदारांच्या रांगा लागल्या हाेत्या. यात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला हाेता. थेट मतदारांमधून निवडून आलेल्या सरपंचाला मतदारांनी मतदान करून नाकारण्याची नरखेड तालुक्यातील ही पहिलीच घटना हाेय.