मतदारांनो मतदानात अवश्य सहभागी व्हा : अश्विन मुदगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 09:55 PM2019-04-08T21:55:08+5:302019-04-08T22:00:25+5:30
रामटेक व नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून अवश्य मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक व नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवून अवश्य मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी येथे केले.
सिस्टॅमॅटीक वोटर्स एज्युकेशन अॅण्ड इलेक्ट्रोल पार्टीसिपेशन प्रोग्राम (स्वीप) अंतर्गत क्षेत्रीय प्रचार कार्यालय, महाराष्ट्र आणि गोवा क्षेत्र, माहिती व प्रसारण मंत्रालय, भारत सरकार आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य, यांच्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मतदार जनजागृती अभियान रथाच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, निवडणूक नोडल अधिकारी (नागपूर शहर) राजेंद्र भुयार, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर, क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सहायक संचालक मीना जेटली प्रामुख्याने उपस्थित होते.
रामटेक व नागपूर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत ११ एप्रिल २०१९ रोजी मतदारांनी मतदान करून लोकशाही प्रक्रिया अधिक बळकट करण्यास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
क्षेत्रीय प्रचार कार्यालय, भारत सरकार मार्फत मतदार जनजागृती रथ तयार करण्यात आला आहे. या रथावर ‘लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा’, ‘मतदान करा आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करा’, ‘आपल्या मतदारसंघातील निवडणुकीचा दिनांक जाणा’, ‘अवश्य मतदान करा’, असे विविध संदेश देण्यात आले आहेत. शहरातील विविध भागात हा मतदार जनजागृती रथ फिरणार आहे. रंगधून कलामंच, नागपूर यांच्यामार्फत नागपूर शहरातील दक्षिण मध्य, दक्षिण, पूर्व, मध्य, पश्चिम, उत्तर या भागात ६८ ठिकाणी हे मतदार जनजागृती रथ जाणार आहे. या ठिकाणी कलापथकांच्या चमूद्वारे पथनाट्य सादर करून मतदानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.
याप्रसंगी नायब तहसीलदार अश्विनी जाधव, विस्तार अधिकारी शेषराव चव्हाण, मनपा शिक्षण विभागाचे विनय बगले, रंगधून कला मंचाचे अध्यक्ष राजाभाऊ वेणी, सचिव मोरेश्वर दंडाळे यांच्यासह कला पथकातील कलावंत उपस्थित होते.