मतदारच घडवून आणतील परिवर्तन ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 04:05 AM2020-11-29T04:05:02+5:302020-11-29T04:05:02+5:30

कॉंग्रेस पक्षश्रेष्‍ठींचा विश्‍वास, वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद, पक्षांतील ज्‍येष्‍ठ व श्रेष्‍ठ नेत्‍यांचे सहकार्य, विविध संघटनांचा मिळालेला पाठिंबा आणि आणि मतदारांचे ...

Voters will bring about change () | मतदारच घडवून आणतील परिवर्तन ()

मतदारच घडवून आणतील परिवर्तन ()

Next

कॉंग्रेस पक्षश्रेष्‍ठींचा विश्‍वास, वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद, पक्षांतील ज्‍येष्‍ठ व श्रेष्‍ठ नेत्‍यांचे सहकार्य, विविध संघटनांचा मिळालेला पाठिंबा आणि आणि मतदारांचे प्रेम याआधारे मला पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकेन, असा विश्‍वास वाटतो आहे. मतदारांना आता परिवर्तन पाहिजे आहे आणि मला खात्री आहे, तेच मला विजयी करून परिवर्तनाची वाट मोकळी करून देतील, असा विश्वास महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

..........

प्रश्न. : कॉंग्रेस पक्षश्रेष्‍ठींनी तुमच्‍यावर जो विश्‍वास टाकला, तो सार्थ ठरविण्यासाठी कसे नियोजन केले ?

ॲड. अभिजित वंजारी : कॉंग्रेस अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी स्‍वत: नागपूर पदवीधर मतदार संघात लक्ष घातले आणि एक पत्र पाठवून त्‍याद्वारे माझ्या नावाची घोषणा केली होती. एखाद्या पदवीधर मतदार संघाच्‍या निवडणुकीची पक्षाच्‍या उच्‍चस्‍तरावरून दखल घेण्‍याची कदाचित ही पहिलीच घटना असावी. पक्षश्रेष्‍ठींनी माझ्यावर हा जो विश्‍वास ठाकला आहे, तो सार्थ करण्‍याची ही वेळ आहे. माझी उमेदवारी जाहीर केल्‍यानंतर मी लगेच कामाला लागलो. पदवीधरांची नोंदणी प्रक्रिया सुरू केली. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा अशा सहा जिल्ह्यांतील ६३ तालुक्यांमधील ३२ विधानसभा क्षेत्रातील पावणेसात हजारहून अधिक ग्रामपंचायत, साडेसहा हजार खासगी व सरकारी महाविद्यालये या सर्व ठिकाणी भेटी दिल्या. उमेदवारीचा अर्ज भरला तेव्‍हा कॉंग्रेस प्रदेशाध्‍यक्ष बाळासाहेब थोरात उपस्‍थित होते. पक्षश्रेष्‍ठी, पक्षाचे ज्‍येष्‍ठ नेते, कार्यकर्ते, विविध संघटनांचे पाठबळ मिळाले.

प्रश्न : संपर्क दौऱ्यात मतदारांच्‍या मानसिकतेचा काय अंदाज आला ?

ॲड. अभिजित वंजारी : मागील कित्‍येक वर्षापासून पदवीधर मतदार संघात सातत्याने एकाच पक्षाला संधी मिळत आलेली आहे. या काळात पदवीधरांचे प्रश्‍न मात्र कायम आहेत. बेरोजगारी वाढतेच आहे. त्‍यामुळे मतदार नाराज आहेत. त्‍यांना आता परिवर्तन हवे आहे. मतदार संघात मी जेव्‍हा फिरलो तेव्‍हा कॉंग्रेसने एक अनुभवी, उत्‍साही, प्रामाणिक उमेदवार निवडणुकीसाठी उभा केल्‍याचे पाहून त्‍यांच्‍यातला उत्साह वाढल्याचे दिसून आले.

प्रश्न : कॉंग्रेसमध्ये बऱ्याच कालावधीनंतर एकजूट बघायला मिळते आहे?

ॲड. अभिजित वंजारी : मी जिथे जिथे प्रचार सभा घेतल्‍या तिथे कॉंग्रेसच्‍या ज्‍येष्‍ठ, श्रेष्‍ठ नेत्‍यांनी आवर्जून उपस्‍थिती लावली. सर्वांनी एकत्र माझा प्रचार केला आहे. मी स्वत:ला भाग्य‍शाली समजतो की, या निवडणुकीच्या कॉंग्रेसचे सर्व नेते एकजुटीने कामाला लागले आहेत. तालुका, वॉर्ड स्तरावरील नेते व कार्यकर्त्‍यांच्‍या मार्गदर्शनात दररोज पंचवीस ते पन्नास मतदारांना मी रोज भेटतो आहे. त्यामुळे कॉंग्रेसची प्रतिमा उंचावण्यास मदत होते आहे.

प्रश्न : महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीचा किती फायदा होईल ?

ॲड. अभिजित वंजारी : पुरोगामी महाराष्ट्रात शाहू-फुले-आंबेडकर या थोर समाजपुरुषांचे विचार अमलात आणणाऱ्या महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे. या सरकारने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वांत मोठी कर्जमाफी जाहीर केली. कोरोनासारख्‍या प्राणघातक साथरोगाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात परिस्‍थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सरकारने वर्षभरात सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेतले. त्याचा नक्कीच फायदा होईल.

प्रश्न : पदवीधरांच्या प्रश्नांना महाविकास आघाडी सरकार कितपत न्याय देईल?

ॲड. अभिजित वंजारी : पदवीधरांचे प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्यांचा आवाज आजपर्यंत सरकारपर्यंत पोहोचवलाच गेलेला नाही. पदवीधरांचे प्रश्न, त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी विधान परिषद हे एक मजबूत व्यासपीठ आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी, न्याय्य हक्कासाठी एक पथदर्शी संकल्पचित्र तयार करण्‍यात आले आहे. महाविकास आघाडी सरकार पदवीधरांच्या प्रश्नांना पूर्णपणे न्याय देईल.

प्रश्न : तुमची शैक्षणिक, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमी या निवडणुकीत किती फायदेशीर ठरू शकेल ?

ॲड. अभिजित वंजारी : राजकारण हे माझ्यासाठी साध्य नसून समाजकारणाचे एक साधन आहे. वडील स्व. गोविंदराव वंजारी यांच्‍याकडून मिळालेल्‍या राजकारण व समाजकारणाच्‍या वारसााने मला ही निवडणूक लढविण्‍यासाठी प्रोत्‍साहित केले आहे. रोजगार मेळावे, विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन, चर्चासत्र, विविध स्पर्धांचे आयोजन या संस्था करत आहेत. सलग १५ वर्षे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन व सिनेटचा सदस्य राहण्याची संधी मिळाली. सिनेटचे १० वर्ष प्रतिनिधित्व केले. त्या निवडणुकीत सर्वाधिक मतांनी जिंकून आलो होतो. सिनेट व व्यवस्‍थापन परिषदेत काम करताना विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना भेडसावणाऱ्या समस्या जवळून पाहिल्या आहेत. एनएसयुआयच्‍या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीसपदी असताना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने केली, कारावासही भोगला. प्रदेश युवक कॉंग्रेसचा सचिव, युवक व स्पोर्ट्स क्लब सेलचा उपाध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. कॉंग्रेसचा पक्षाचा सच्चा कार्यकर्ता, राजकीय, सामाजिक शैक्षणिक पार्श्‍वभूमी याचा या निवडणुकीत मला निश्‍चित फायदा मिळेल, अशी खात्री आहे.

प्रश्न : तुमचे ''''मिशन परिवर्तन'''' काय आहे ?

ॲड. अभिजित वंजारी : प्रत्येक क्षेत्रातील पदवीधरांच्या उज्वल भविष्यासाठी, त्यांना कौशल्य विकासाच्या, रोजगाराच्या व स्‍वयंरोजगाराच्‍या संधी मिळवून देण्यासाठी, आणि त्‍यांचे स्वप्न साकारण्यासाठी पदवीधरांची एक सामूहिक शक्ती उभी करायची आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये आवश्यकतेनुसार पारदर्शक निधीचे वाटप, विधान परिषदेत त्यांच्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण मांडणी, गरज पडल्यास रस्यावर उतरून आंदोलन करायचे आहे. पदवीधरांना सल्ला व मार्गदर्शन मिळावे यासाठी स्वतंत्र कॉल सेंटरची स्थापना, सरकारी योजनांची काटेकोर अंमलबजावणी, जगभरातील उत्तम पॉलिसींचे संशोधन व जनसंवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा मानस आहे. विद्यापीठांमध्ये स्टार्टअप्ससाठी इनक्युबेशन सेंटर, लॉजिस्टीक मॅनेजमेंज डिग्री आणि डिप्लोमा, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर टीचर्स, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी डीबीटी पोर्टल, विदर्भातील विद्यापीठांचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष आर्थिक पॅकेज देणे हे आमच्‍या अजेंड्यावर आहे. नवपदवीधर, स्पर्धा परीक्षा देणारे तरुण, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक, संशोधक, प्रशासकीय कर्मचारी, स्वतंत्र व्यावसायिक, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कर्मचारी, पदवीधर महिला, शेतकरी कुटुंबातील पदवीधर, तरुण उद्योजक, कार्पोरेट क्षेत्रातील कर्मचारी यांच्या आयुष्यात अशा रीतीने परिवर्तन घडवून आणणे, हेच आमचे ''''मिशन परिवर्तन'''' आहे.

Web Title: Voters will bring about change ()

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.