नागपुरात महिलांची मतदानाची टक्केवारी कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 10:41 PM2019-01-22T22:41:13+5:302019-01-22T22:43:59+5:30
निवडणुकीत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी कमी आहे. महापालिकेच्या दहा झोनमधील अशा दहा मतदान केंद्राची पडताळणी केली असता ही बाब निदर्शनास आली आहे. याचा विचार करता मतदानाविषयी महिला मतदारात अधिक जागृती करण्याची गरज असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीत पुरुष मतदारांच्या तुलनेत महिला मतदारांच्या मतदानाची टक्केवारी कमी आहे. महापालिकेच्या दहा झोनमधील अशा दहा मतदान केंद्राची पडताळणी केली असता ही बाब निदर्शनास आली आहे. याचा विचार करता मतदानाविषयी महिला मतदारात अधिक जागृती करण्याची गरज असल्याची माहिती महापौर नंदा जिचकार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २६ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान लोकशाही पंधरवड्याचे आयोजन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. या दरम्यान शहरात विविध ठिकाणी आणि विविध माध्यमातून मतदार नोंदणी करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती महापौरांनी दिली. यावेळी अपर आयुक्त रवींद्र ठाकरे, सहायक आयुक्त महेश धामेचा उपस्थित होते.
शाळा, महाविद्यालये यासह शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये आदींसह सार्वजनिक ठिकाणी जनजागृतीचे उपक्रम राबविण्यात येणार आहे. वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक युवक-युवतीने मतदार यादीत नाव नोंदवावे, ज्यांनी अद्यापही मतदार यादीत नाव नोंदविले नसेल अशा नागरिकांनीही नाव नोंदणी करावी, यासाठी व्यापक प्रमाणावर लोकशाही पंधरवड्यामध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. ही जनजागृती बॅनर्स, होर्डिंग्स, रेडिओ जिंगल्स, टीव्ही, केबल, वर्तमानपत्र आदींच्या माध्यमातून करण्यात येईल. यासोबतच सार्वजनिक ठिकाणी पथनाट्य, विविध सार्वजनिक कार्यक्रमात स्टॉल्स लावून मतदार नोंदणीविषयी माहिती देण्यात येईल. शासकीय कार्यालय, खासगी कार्यालय व अन्य ठिकाणी ‘लोकशाही, निवडणूक व सुशासन’ या विषयावर चर्चासत्र, परिसंवादाचे आयोजन करण्यात येईल. २६ जानेवारी रोजी नागपूर शहरात होत असलेल्या शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांच्या ध्वजवंदन कार्यक्रमात सर्व प्रमुख वक्तांच्या भाषणांमध्येही लोकशाही पंधरवड्यादरम्यान द्यावयाचा संदेश अंतर्भूत करण्यात येईल.
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रमाणपत्र
लोकशाही पंधरवड्यात मतदार नोंदणीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. शहरातील विविध महाविद्यालयात मतदार नोंदणीची माहिती देणारे स्टॉल्स ठेवण्यात येणार आहे. याच ठिकाणी मतदार नोंदणीचे फॉर्मसुद्धा भरून घेण्यात येतील. मतदार नोंदणी करणाऱ्या पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात येईल. महाविद्यालयांमध्ये सेल्फी कॉर्नर उभारण्यात येईल. ‘मी मतदार यादीत नाव नोंदविणार’ असा फलक घेऊन विद्यार्थी सेल्फी काढतील.
ऑरेंज फेस्टिव्हलदरम्यान स्वाक्षरी मोहीम
महापालिकेच्या वतीने लोकशाही पंधरवड्यानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमात नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी पूर्वतयारी म्हणून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. फुटाळा तलाव येथे वर्ल्ड ऑरेंज फेस्टिव्हलदरम्यान स्वाक्षरी मोहीम, वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या युथ एम्पॉवरमेंट समीटमध्ये मतदार जागृतीसंदर्भात स्टॉल लावण्यात आला. सेल्फी कॉर्नर तयार करून युवा वर्गाला मतदार नोंदणीबाबत सांगण्यात आले. महिला उद्योजिका मेळाव्यात स्टॉल, सेल्फी कॉर्नर, मतदार जागृतीचा संदेश असलेला बलून आकाशात सोडण्यात आला. कमला नेहरू महाविद्यालयात स्नेहमिलन कार्यक्रमात लोकशाही पंधरवड्याबाबत माहिती देण्यात आली. खासदार क्रीडा महोत्सवादरम्यान प्रतापनगर येथील समर्थ व्यायाम शाळेच्या मैदानावरही तेथे उपस्थितांना लोकशाही पंधरवड्याबाबत माहिती देण्यात आली.