तीन हजार कें द्रांवर मतदान
By admin | Published: September 16, 2016 03:14 AM2016-09-16T03:14:43+5:302016-09-16T03:14:43+5:30
महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होत आहे. ही निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार
नागपूर : महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होत आहे. ही निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असल्यामुळे प्रत्येक मतदाराला या वेळी चार उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. यासाठी मतदाराला एक मिनिटाऐवजी दीड मिनिटाचा वेळ लागेल. याचा विचार करता मतदानाच्या वेळेत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी नागपूर शहरातील मतदान केंद्रांची संख्या १८१० वरून ३००० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. म्हणजेच १२०० नवीन मतदान केंद्र वाढणार आहेत.
नागपूर शहरात २० लाख १६ हजार ९८८ मतदार असून १८१० मतदान केंद्र आहेत. परंतु महापालिकेची निवडणूक प्रथमच चार सदस्यीय प्र्रभाग पद्धतीने होत आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला आता दोन ऐवजी चार उमेदवारांना मतदान करावयाचे आहे. मतदान केंद्रावर चार ईव्हीएम असतील. यामुळे ईव्हीएम मशीनचीही संख्या वाढणार आहे. हे पाहता मतदानासाठी अधिक वेळ लागेल. सध्या एका मतदान केंद्रावर ८०० ते १००० मतदार आहेत. परंतु एकाचवेळी अधिक उमेदवारांना मतदान करावयाचे आहे. सर्व मतदारांना मतदानासाठी अधिक वेळ लागणार आहे. त्यामुळे या वेळी एका मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या ६०० ते ७०० इतकीच ठेवली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. यावेळी उपआयुक्त रवींद्र कुंभारे व रवींद्र देवतळे उपस्थित होते.
निवडणुकीसाठी मतदार यादी अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. गेल्या निवडणुकीनंतर जे मतदानास पात्र आहेत, त्यांनी मतदार यादीत आपली नावे नोंदवावी. गेल्या निवडणुकीत मतदारांना मतदान करताना अडचणी आल्या असल्यास त्यांनी त्या दूर कराव्या. मतदारांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी मतदार नोंदणीची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.
मतदार यादीत नावाचा समावेश आहे की नाही, याची मतदारांनी ‘डब्ल्यूडब्ल्यू डॉट सीइओ डॉट महाराष्ट्र डॉट गर्व्हमेन्ट डॉट इन ’या वेबसाईटवर खात्री करावी. ज्यांची नावे नसतील त्यांनी आपल्या नावाचा मतदार यादीत समावेश करण्यासाठी आॅनलाईन अथवा महानगरपालिकेच्या सर्व झोन कार्यालयात, मतदान केंद्र असलेल्या शाळा, तसेच जिल्हा निवडणूक विभाग यांच्या कार्यालयात अर्ज करता येईल. झोन कार्यालयात अर्ज स्वीकृती केंद्र उघडण्यात आले असून सर्व सहायक आयुक्तांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आल्याची माहिती हर्डीकर यांनी दिली.
जानेवारीत १८ वर्षे होणाऱ्यांचीही नोंदणी
महानगरपालिकेच्या निवडणुकीत १ जानेवारी २०१७ रोजीची मतदार यादी गृहीत धरली जाणार आहे. त्यामुळे सध्या १८ वर्ष पूर्ण व्हायचे आहे परंतु १ जानेवारी २०१७ रोजी ते पूर्ण होणार आहे अशा युवकांनाही मतदार यादीत आपली नावे नोंदविता येणार आहे. त्यामुळे अशा युवकांनीही मतदार यादीत आपली नावे नोंदवावी. असे आवाहन हर्डीकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
विद्यार्थ्यांंनी नावे नोंदवावी
४सर्व महाविद्यालयात १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर २०१६ मतदार नोंदणी जागृती अभियान राबविले जाणार आहे. १ जानेवारी २०१७ रोजी जे विद्यार्थी १८ वर्षाचे होणार असतील त्यांचे मतदार नोंदणी अर्ज क्रमांक ६ भरून मतदार यादीत नावे नोंदवावयाची आहेत. यासाठी प्राचार्यांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. यासाठी महानगरपालिकेतर्फे माहिती पत्रक व फ्लॅक्स उपलब्ध करण्यात असल्याची माहिती हर्डीकर यांनी दिली.
गठ्ठा अर्ज स्वीकारणार नाही
मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी काही राजकीय पक्षाच्या कार्यालयात अर्ज भरून घेतले जातात. असे गठ्ठा अर्ज स्वीकारले जाणार नाही. या प्रक्रियेत अनेकदा त्रुटी राहतात. त्यामुळे नावांचा समावेश होत नाही. त्यामुळे गठ्ठा अर्ज स्वीकारले जाणार नाही. मतदार नोंदणी करताना अर्जदारांनी स्वत: झोन कार्यालये, निवडणूक विभागाचे कार्यालय अथवा मतदान केंद्र ,अशा ठिकाणी अर्ज सादर करावयाचे आहेत.
मतदार जागृती अभियान
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नवीन मतदार नोंदणी, मतदार नोंदणीवरील दावे व हरकती दाखल करण्यासाठी १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर २०१६ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. मतदार नोंदणीची विशेष मोहीम १८ सप्टेंबर व ९ आॅक्टोबर २०१६ ला घेण्यात येणार आहे. १ ते ३१ आॅगस्ट २०१६ या कालावधीत मतदार जागृती कार्यक्रम राबविण्यात आला आहे. या अंतर्गत नवीन १६७७० मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर २०१६ या कालावधीत मतदार जागृती अभियान राबविले जाणार आहे.