नागपुरात पुरुषांपेक्षा महिला शिक्षक मतदारांची संख्या अधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 10:50 AM2023-01-30T10:50:07+5:302023-01-30T10:50:54+5:30

आज शिक्षक, पदवीधर मतदारसंघासाठी मतदान

Voting today for Teachers, Graduate Constituency; Female teacher voters are more than male in Nagpur | नागपुरात पुरुषांपेक्षा महिला शिक्षक मतदारांची संख्या अधिक

नागपुरात पुरुषांपेक्षा महिला शिक्षक मतदारांची संख्या अधिक

googlenewsNext

नागपूर/अमरावती : विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. नागपूर जिल्ह्यातील शिक्षक मतदारांची एकूण संख्या १६,४८० आहे. यात ९,२५६ महिला तर ७,२२४ पुरुष मतदार आहेत. म्हणजेच पुरुषांपेक्षा महिला शिक्षक मतदारांची संख्या नागपुरात अधिक आहे.

- १ आकडा महत्त्वाचा

सुशिक्षित मतदारांची संख्या असणाऱ्या या निवडणुकीत निवड प्रक्रिया ही पसंती क्रमावर अवलंबून असते. जेवढे उमेदवार असतील त्या सर्वांना पसंती क्रमांक देणे आवश्यक असते. मात्र, यातील मॅजिक फिगर हा आकडा (१) असतो. एक आकडा घातलेला नसेल. एक आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला असेल. एक हा आकडा तो कोणत्या उमेदवाराला देण्यासाठी घातलेला आहे, याबद्दल संदेह निर्माण होईल, अशा प्रकारे घातलेला असेल. एकाच उमेदवाराच्या नावासमोर एक आकड्यासोबत आणखी दोन-तीन आकडेदेखील घातलेले असतील. पसंती क्रमांक आकड्यात (१), शब्दांमध्ये (एक) असा दर्शवला असेल किंवा मतदाराची ओळख पटू शकेल, अशी एखादी खूण मतपत्रिकेवर केली असेल तर तुमचे मतदान अवैध ठरते. या निवडणुकीत जांभळ्या रंगाच्या स्केच पेनव्यतिरिक्त अन्य कोणत्याही साधनाने आकडा टाकल्यास मतपत्रिका अवैध ठरते. त्यामुळे शिक्षकांच्या या निवडणुकीत मतदारांनी योग्य पद्धतीने मतदान करण्याचे आवाहन निवडणूक विभागाने केले आहे.

- अजनी येथे होणार मतमोजणी

अजनी रेल्वे स्थानकाजवळील सामुदायिक भवन या ठिकाणी सुरक्षा भवन (स्ट्राँग रूम) उभारण्यात आले असून, ३० तारखेला मतपेट्या या ठिकाणी जमा होणार आहेत. २ फेब्रुवारीला याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे.

अमरावती ‘पदवीधर’साठी २६२ केंद्रांमध्ये मतदान

अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी ३० जानेवारीला विभागातील २६२ मतदान केंद्रांत मतदान होणार आहे. या निवडणुकीत राजकीय पक्षाचे चार व अपक्ष १९ असे २३ उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीत २,०६,१७२ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. दरम्यान रविवारी सकाळी मतदार पथके मतदान केंद्रांसाठी रवाना झाली आहेत. निवडणुकीसाठी अमरावती जिल्ह्यात ७५, अकोला ६१, बुलढाणा ५२, वाशिम २६ व यवतमाळ जिल्ह्यात ४८ मतदान केंद्रे आहेत. निवडणुकीसाठी मतदान केंद्राध्यक्ष २८८, मतदान अधिकारी ११५३ व सूक्ष्म निरीक्षक म्हणून २८९ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे. विभागात ग्रामपंचायत निवडणूक झाली असल्याने डाव्या हाताच्या तर्जनीऐवजी मधल्या बोटाला शाई लावण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणुकीसाठी मतदारसंघात १५९ पोलिस अधिकारी, १२५१ शिपाई असे एकूण १,४१० अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त राहणार आहे. २ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

Web Title: Voting today for Teachers, Graduate Constituency; Female teacher voters are more than male in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.