६७ वे विदर्भ साहित्य संमेलन पुढे ढकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:32 AM2020-03-13T11:32:44+5:302020-03-13T11:33:12+5:30
विदर्भ साहित्य संघातर्फे १४ मार्चपासून हिंगणा येथे सुरू होणारे ६७ वे विदर्भ साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय वि.सा. संघाने घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूचा धसका साहित्य जगतानेही घेतला आहे. विषाणूचा वाढता प्रभाव लक्षात घेता विदर्भ साहित्य संघातर्फे १४ मार्चपासून हिंगणा येथे सुरू होणारे ६७ वे विदर्भ साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय वि.सा. संघाने घेतला आहे. आयोजन समितीच्या शुभदा फडणवीस यांनी गुरुवारी हा निर्णय जाहीर केला.
कोरोना विषाणूचा जगभरात वाढता प्रभाव व वाढती मृतांची आकडेवारी यामुळे पाहता युनोने या आजाराला महामारी म्हणून घोषित केले आहे. महाराष्ट्रातही या विषाणूचा फैलाव वेगाने होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पुणे, मुंबईनंतर नागपुरातही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विषाणूचा राज्यात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने राज्यातील सर्व शासकीय आणि सार्वजनिक सोहळे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे १४ व १५ मार्च रोजी हिंगण्यातील संत गाडगे महाराज महाविद्यालयाच्या परिसरात ६७ वे विदर्भ साहित्य संमेलन होऊ घातले होते. बसवेश्वर एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधाकर मोगलेवार यांनी स्थापन केलेल्या या संस्थेत साहित्य संमेलन होणार असल्याने हिंगणावासी आनंदात होते. संमेलनाची तयारीही अंतिम टप्पात आली होती. पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. मात्र राज्यासह नागपुरातही कोरोना संशयित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर साहित्य रसिक आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने हे साहित्य संमेलन पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजन समितीचे जाहीर केला. विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आकस्मिक बैठक बोलावून हा निर्णय जाहीर केला. मात्र संमेलनामुळे हिंगणावासीयांच्या आनंदावर विरजण पडू दिले जाणार नसून त्यांचा उत्साह बघता महिनाभरानंतर हे संमेलन येथेच होईल अशी माहिती शुभदा फडणवीस यांनी दिली. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता हा संमेलन पुढे ढकलणे संयुक्तिक राहील, असे मत संयोजक डॉ. गणेश चव्हाण यांनी व्यक्त केले. या पत्रपरिषदेला वि. सा. संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग, सरचिटणीस विलास मानेकर, संचालक उदय मोगलेवार, प्राचार्य आरती मोगलेवार, डॉ. गणेश मायवाडे, डॉ. संजय ढोक व डॉ. अनिल चरडे उपस्थित होते.