आपली बस कंडक्टर व चालकांना पाच हजाराची वेतनवाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 09:17 PM2019-12-30T21:17:32+5:302019-12-30T21:20:26+5:30
महापालिकेच्या आपली बस सेवेतील कंडक्टर व चालकांना नियमानुसार वेतन मिळणार आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर दर महिन्याला एक कोटींचा बोजा वाढणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिकेच्या आपली बस सेवेतील कंडक्टर व चालकांना नियमानुसार वेतन मिळणार आहे. यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर दर महिन्याला एक कोटींचा बोजा वाढणार आहे. कंत्राटदारांसोबत केलेल्या करारानुसार कर्मचाऱ्यांना नियमानुसार वेतन, पगारी साप्ताहिक रजा, वर्षाला १५ पगारी रजा, आठ तासाहून अधिक काम केल्यास ओव्हरटाईम देण्याबाबतचा निर्णय सोमवारी परिवहन विभागाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात जवळपास पाच हजारांची वाढ होणार आहे.
परिवहन समितीचे सभापती बाल्या बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही पार पडली. यावेळी उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते, परिवहन विभागाचे श्रम अधिकारी अरूण पिपरूडे, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, लेखा अधिकारी विनय भारव्दाज सुकीर सोनटक्के यांच्यासह बस ऑपरेटर उपस्थित होते.
किमान वेतन मिळावे, तक्रार सुनावणीसाठी कक्ष निर्माण करावा, नियमानुसार आठवड्याला पगारी रजा, ८ तासाहून अधिक काम केल्यास ओव्हर टाईम देण्यात यावा, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली होती. मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत बोरकर यांनी बैठकीचे आयोजन केले होते. आठवडी परिवहन विभागाच्या कंडक्टर व चालकांवर अन्याय होणार नाही, त्यांच्या सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न राहील अशी ग्वाही बोरकर यांनी दिली.
कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुटीबाबतचे परिपत्रक आठ दिवसात सादर करा, वर्षाला १५ पगारी रजा संदर्भात एक धोरण निश्चित करून पुढील बैठकीत सादर करण्याचे निर्देश बोरकर यांनी दिले. किमान वेतन कायदा व औद्योगिक कामगार कायद्यात या बाबींचा समावेश आहे. परंतु मागील काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांची ही प्रलंबित होती. यामुळे कर्मचाºयांत असंतोष होता. तिकीट चोरीचे प्रमाण वाढले आहे. आंदोलनाचाही इशारा दिला होता.
चौकशीसाठी समिती
विना तिकीट प्रवासी आढळून आल्यास त्यावर सुनावणी न करता तात्काळ निलंबित केले जात होते. परंतु यात निर्दोष कर्मचाऱ्यांवर अन्याय होत होता. त्यामुळे विना तिकिट प्रवासी प्रकरणाची चौकशी व सुनावणी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती गठित करण्यात येणार आहे. यात रवींद्र पागे, अरुण पिपरूडे व सूर्यकांत अंबाडेकर यांचा समावेश राहणार आहे. चौकशीनंतर १५ दिवसात प्रवासी रक्कम व दंड वसूल करून संबंधित कंडक्टरला कामावर घेतले जाणार असल्याचे नरेंद्र बोरकर यांनी सांगितले. चौथ्यांना विना तिकीट प्रवासी आढळल्यास संबंधित कंडक्टरला निलंबित के ले जाईल, अशी माहिती बोरकर यांनी दिली.