शेडेश्वर येथे वाघोबा आला रे....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 12:42 AM2021-07-29T00:42:50+5:302021-07-29T00:43:38+5:30
Tiger जंगलालगतच्या शेडेश्वर (ता.उमरेड) गाव व परिसरात गुरांच्या शिकारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेकांनी बिबट्यांसह वाघालाही या भागात वावरताना बघितले आहे. त्यामुळे कुणीही शेतात कामाला जाण्याची हिंमत करीत नसल्याने, पिकांच्या मशागतीची कामे ठप्प झाली आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
बेला : जंगलालगतच्या शेडेश्वर (ता.उमरेड) गाव व परिसरात गुरांच्या शिकारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेकांनी बिबट्यांसह वाघालाही या भागात वावरताना बघितले आहे. त्यामुळे कुणीही शेतात कामाला जाण्याची हिंमत करीत नसल्याने, पिकांच्या मशागतीची कामे ठप्प झाली आहेत.
हा संपूर्ण परिसर जंगलव्याप्त असून, या जंगलात वाघ, बिबटे व इतर वन्य प्राण्यांचा वावर आहे. मागील वर्षी या भागात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला हाेता. त्या बिबट्याने शिवारासह गावात येऊन गाई, वासरे, बकऱ्या व काेंबड्यांची शिकार केल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले हाेते. त्यानंतर, वन कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत, त्या बिबट्याला जेरबंद केले आणि दूरवरच्या जंगला नेऊन साेडले. त्यामुळे येथील नागरिक काहीसे भयमुक्त झाले हाेते.
दरम्यान, अलीकडच्या काळात याच भागात पुन्हा वाघाची दहशत निर्माण झाली आहे. या वाघाला दिवसा शेडेश्वर शिवारात फिरताना बघितल्याचे अनेकांनी सांगितले. त्याने साेमवारी (दि.१९) वसंता आसाेले, रा.शेडेश्वर यांच्या बकरीवर हल्ला चढविला हाेता. त्यानंतर, त्याने मंगळवारी (दि. २०) वामन चावले, रा.शेडेश्वर यांच्या गाेठ्यात शिरून दाेन बकऱ्यांची शिकार केली. तत्पूर्वी त्याने रविवारी (दि. २५) मध्यरात्री परमेश्वर तुळशीराम शिरजाेशी, रा.शेडेश्वर यांच्या दाेन बकऱ्यांचा फडशा पाडला.
गुरांच्या या वाढत्या शिकारीमुळे या भागात वाघाची दहशत निर्माण हाेत आहे. वनकर्मचाऱ्यांनी माहिती मिळताच, या सर्व घटनांचा घटनास्थळी येऊन पंचनामा केला. या वाघामुळे शेतात कामाला जाण्याची हिंमत हाेत नसल्याचे शेतकऱ्यांसह मजुरांनी सांगितले. या वाघाचा वाढता उपद्रव लक्षात घेता, वनविभागाचे त्याचा बिबट्याप्रमाणे याेग्य बंदाेबस्त करावा, अशी मागणीही शेडेश्वर येथील शेतकऱ्यांसह नागरिकांनी केली आहे.
नुकसान भरपाईची तरतूद
वाघ किंवा बिबट्याच्या हल्ल्यात माणसाचा मृत्यू झाल्यास त्याला १५ लाख रुपये, अपंगत्व आल्यास पाच लाख रुपये गंभीर जखमी झाल्यास, १ लाख २५ हजार रुपये, किरकाेळ जखमी झाल्यास २० हजार रुपये, तसेच गाय, म्हैस व बैलाचा मृत्यू झाल्यास त्याच्या बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा ६० हजार रुपये, बकरी, मेंढी व इतर पशुधनाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या बाजारभावाच्या ७५ टक्के किंवा १० हजार रुपये, हे पशुधन जखमी झाल्यास चार हजार रुपये किंवा त्याच्या कमी रक्कम राज्य शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून दिली जाते.