वाघोली गाव पायाभूत सुविधांपासून दूर; आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर सोमवारी आंदोलन
By मंगेश व्यवहारे | Published: December 18, 2023 11:36 AM2023-12-18T11:36:57+5:302023-12-18T11:38:11+5:30
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार अशोक पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सोमवारी आंदोलन केले.
नागपूर : शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातील वाघोली गावातील समस्यांकडे सरकारचे सपशेल दुर्लक्ष आहे. तिथे पायाभूत सुविधाही नाहीत, असा आरोप करत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार अशोक पवार यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सोमवारी आंदोलन केले.
वाघोली गावाची लोकसंख्या ३.५ लाखाच्या जवळपास आहे. औरंगाबाद, अहमदनगर आणि विविध शहरांमध्ये जोडणारा मार्ग या गावातून जातो. मात्र, अद्याप येथे चांगले मार्ग नाहीत. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना दोन-दोन तास ताटकळत रहावे लागते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उड्डाणपूलाचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याचे काहीही झाले नाही. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने कोट्यवधी रुपये टँकरवर खर्च करावे लागतात.
सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होतो, असे आमदार अशोक पवार यांनी सांगितले. यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, आमदार उदयसिंग राजपूत उपस्थित होते.