देश विकासात वेकोलिची भूमिका महत्त्वाची
By admin | Published: April 20, 2015 02:10 AM2015-04-20T02:10:36+5:302015-04-20T02:10:36+5:30
देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी कोळशाचे जास्तीतजास्त उत्पादन होणे गरजेचे आहे.
नागपूर : देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी कोळशाचे जास्तीतजास्त उत्पादन होणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने एक दूरदृष्टीचा कार्यक्रम आखला असून, देशाच्या या विकासात वेकोलिची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, नव्हे तर वेकोलि या दूरदृष्टीचाच एक भाग आहे, असे प्रतिपादन कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिल स्वरूप यांनी रविवारी येथे व्यक्त केले.
वेस्टर्न कोल लिमिटेडतर्फे सिव्हिल लाईन्स येथील कोल इस्टेट स्थित सांस्कृतिक भवनात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी कोल इंडियाच्या सेंट्रल माईन्स प्लॅनिंग अॅण्ड डिझाईन इन्स्टिट्यूटचे सीएमडी ए. के. देबनाथ प्रमुख पाहुणे होते. वेकोलिचे अध्यक्ष व प्रबंध संचालक राजीव रंजन मिश्र, संचालक (पर्सनल) रूपक दयाल आणि संचालक (तांत्रिक) एस.एस. मल्ही प्रामुख्याने उपस्थित होते. अनिल स्वरूप म्हणाले, तुम्ही जे काही कार्य कराल ते मन लावून प्रसन्न मनाने करा. ज्या कामामुळे तुम्हाला आनंद मिळतो, ते काम अधिक चांगले होते, त्यामुळे जे कार्य कराल त्यावर गर्व करा, असे आवाहनही त्यांनी केले. ए. के. देबनाथ यांनीही आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी स्वागतपर भाषण करताना राजीव रंजन मिश्र यांनी सांगितले की, स्वरूप यांच्या मार्गदर्शनानुसार वेकोलि काम करीत आहे. प्रत्येक महिन्यात एक नवीन खाण सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
वेकोलितर्फे ‘व्हिजन २०२०’चे डॉक्युमेंटही यावेळी स्वरूप यांना सादर करण्यात आले. तसेच समाजहितासाठी वेकोलिने घेतलेल्या ‘प्रगती’ या पुढाकाराचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. तसेच याप्रसंगी एस. एस. मल्ही, के.एल. व्यंकटरमण, एल.बी. गुरले, डी. शेषागिरी राव, एस.जी. नासरे, एस. रमण सत्या, अशेक कुमार रावल, धर्मा श्रीधर, मो. जावेद कुरैशी आणि पी.के. सनी या अधिकाऱ्यांचा उत्कृष्ट सेवेबद्दल सन्मान करण्यात आला. (प्रतिनिधी)