जिल्हा परिषदेच्या वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी एक महिना थांबा !
By गणेश हुड | Published: May 4, 2024 06:18 PM2024-05-04T18:18:34+5:302024-05-04T18:20:10+5:30
आचार संहिता शिथील होण्याची प्रतिक्षा : तलाव, रस्ते दुरुस्ती पावसाळयानंतर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रामटेक लोकसभा मतदार संघासाठी १९ एप्रिलला मतदान झाले. ४ जूनला मतमोजणी होणार आहे. तोपर्यंत आचार संहिता कायम असल्याने जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभाग, महिला व बाल कल्याण, शिक्षण तसेच कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजनांना मंजुरी देता येणार नाही. यासाठी एक महिना प्रतिक्षा करावी लागणार आहे. आचार संहिता शिथील झाली तरच लाभार्थींना लाभ देणे शक्य होईल.
महिला व बाल कल्याण विभागामार्फत महिलांना शिलाई मशीन, विद्यार्थीनींना सायकल वाटप, महिलांना पिठाची गिरणी, सौर कंदील, शिलाई मशिन, पिको फॉल मशिन पुरवणे, घटस्फोटीत व परित्यक्त्या महिलांना हक्काचे घर नाही अशा दारीद्र्य रेषेखालील महिलांना घरकुलांसाठी आर्थिक मदत करणे अशा योजना आचार संहितेमुळे राबविता येणार नाही. समाजकल्याण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या वैयक्तिक लाभाच्या योजना आचार संहितेच्या काळात राबविता येणार नाही. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांसाठी पिक संरक्षण औजारे,औषधे, सुधारित कृषि औजारे, प्लास्टिक क्रेटस्, डिझेल,पेट्रोकेरोसिन,विद्युत मोटार, पंपसंच, पीव्हीसी पाईप व प्लास्टिक ताडपत्री अनुदानावर वाटप करण्यात येते. आचार संहितेमुळे या योजनांना ब्रेक लागले आहे.