प्रश्नपत्रिकेसाठी दोन तास प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 01:53 AM2017-10-29T01:53:10+5:302017-10-29T01:53:25+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये शनिवार हा गोंधळाचा दिवसच ठरला. काही परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थ्यांना वेळेवर प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नाहीत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये शनिवार हा गोंधळाचा दिवसच ठरला. काही परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थ्यांना वेळेवर प्रश्नपत्रिकाच मिळाल्या नाहीत. त्यामुळे २ वाजता सुरू होणारा ‘बीकॉम’चा पेपर दीड ते दोन तास उशिरा सुरू झाला. परीक्षा केंद्रांनी या विलंबाचा दोष विद्यापीठाच्या ‘आॅनलाईन डिलिव्हरी’ला दिला आहे.
‘बीकॉम’च्या पहिला सत्राचा शनिवारी ‘फायनान्शियल अकाऊंटिंग’चा पेपर होता. दुपारी २ वाजता पेपर सुरू होणार होता. परीक्षा केंद्रांवर १.४५ च्या सुमारास विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकादेखील वाटण्यात आल्या. मात्र काही परीक्षा केंद्रांवर २ वाजल्यानंतरदेखील प्रश्नपत्रिकांचा पत्ताच नव्हता. विद्यार्थ्यांनी विचारणा केल्यानंतर प्रश्नपत्रिका येण्यास वेळ लागेल. तोपर्यंत बसून रहा, असे सांगण्यात आले. चक्क दीड ते दोन तासांनी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका मिळाल्या. सायंकाळी ५ ला संपणारा पेपर काही ठिकाणी सायंकाळी ७ वाजेपर्यंत चालला. हिवाळ्याची सुरुवात असल्याने यावेळी अंधार झाला होता. त्यामुळे पालकदेखील चिंतेत पडले होते व अनेक विद्यार्थ्यांना घरी परत जाण्यासाठी अडचण झाली. काही परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. विद्यार्थ्यांनी ही बाब केंद्र अधिकाºयांना सांगितल्यानंतर प्रश्नपत्रिका बदलण्यात आल्या. यासंदर्भात महाविद्यालयांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी विद्यापीठाकडे अंगुलीनिर्देश केला. प्रश्नपत्रिकांच्या ‘आॅनलाईन डिलीव्हरी’त त्रुटी होत्या. त्यामुळे चुकीच्या प्रश्नपत्रिका मिळाल्या, असा दावा महाविद्यालयांतर्फे करण्यात आला. काही परीक्षा केंद्रावर उशिराने प्रश्नपत्रिका मिळाली असल्याची बाब परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नीरज खटी यांनी मान्य केली. विलंबाची कारणे शोधण्यासाठी चौकशी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
‘प्रिंटर’ झाले खराब
‘पीडब्ल्यूएस’ महाविद्यालयातील परीक्षा केंद्रांवर तर भलत्याच कारणामुळे विलंब झाला. परीक्षा केंद्रावरील ‘प्रिंटर’ ऐनवेळी खराब झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वेळेवर मिळाल्या नाहीत. हिंदी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना मराठी भाषेतील प्रश्नपत्रिका देण्याचा प्रकारदेखील येथे घडला.