राष्ट्रपतींचा कार्यक्रम तयार मंजुरीची प्रतीक्षा

By admin | Published: September 5, 2015 03:24 AM2015-09-05T03:24:02+5:302015-09-05T03:24:02+5:30

महापालिकेला १५१ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नागपुरात आयोजित शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सहभागी होणार आहेत.

Waiting for the approval of the President's program | राष्ट्रपतींचा कार्यक्रम तयार मंजुरीची प्रतीक्षा

राष्ट्रपतींचा कार्यक्रम तयार मंजुरीची प्रतीक्षा

Next

मनपाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव :
कार्यक्रमाचे प्रारूप राष्ट्रपती भवनकडे सादर

नागपूर : महापालिकेला १५१ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नागपुरात आयोजित शतकोत्तर सुवर्ण महोत्सव सोहळ्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी सहभागी होणार आहेत.
महापालिकेने कार्यक्रमाचे प्रारूप तयार करून मंजुरीसाठी राष्ट्रपती भवनाकडे सादर केले आहे. दोन दिवसात त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता असून महापालिकेने तयारी सुरू केली आहे. वर्धा रोड ते मानकापूर क्रीडा संकुलापर्यंतच्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश प्रशासनातर्फे देण्यात आले आहेत.
संबंधित सोहळ्याच्या तयारीसाठी ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत उपायुक्त रिजवान सिद्दीकी, अतिरिक्त उपायुक्त प्रमोद भुसारी, अधीक्षक अभियंता प्रकाश उराडे तसेच निगम सचिव हरीश दुबे यांचा समावेश आहे. मानकापूर क्रीडा संकुलात १४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.४५ वाजता कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. ५ हजार लोकांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. नियोजन समितीचे अध्यक्ष सुनील अग्रवाल यांनी सांगितले की, राष्ट्रपती भवनाकडे कार्यक्रमाचे प्रारूप सादर करण्यात आले आहे. एक-दोन दिवसात त्याला मंजुरी मिळेल. पत्रिकेचे स्वरुपही राष्ट्रपती भवनाकडे पाठविण्यात आले आहे. त्यात काही दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. अंतिम मंजुरी मिळताच पत्रिका वितरित करण्याचे काम सुरू केले जाईल. (प्रतिनिधी)
असा असेल कार्यक्रम
१४ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.१० वाजता नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे आगमन होईल. सायंकाळी ६.३५ वाजता राष्ट्रपती मानकापूर क्रीडा संकुल येथे पोहचतील. ६.४५ वाजता कार्यक्रम सुरू होईल. सुमारे एक तास कार्यक्रम चालेल. कार्यक्रमादरम्यान महापालिकेचा गौरव ग्रंथ, प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण व २०० एमएलडी क्षमतेच्या नव्या एसटीपीचे राष्ट्रपतींच्या हस्ते लोकार्पण होईल.
मंचावर निवडक अतिथी
कार्यक्रमासाठी भव्य मंच साकारला जाईल. मात्र, निवडक अतिथींनाच या मंचावर बसण्याची संधी मिळेल. राष्ट्रपती, राज्यपाल यांच्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित राहतील.

Web Title: Waiting for the approval of the President's program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.