कॉक्लीअर इम्प्लांटच्या प्रतीक्षेत १५ चिमुकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 11:09 PM2018-08-04T23:09:11+5:302018-08-04T23:10:44+5:30
शासकीय रुग्णालयांमध्ये कॉक्लीअर इम्प्लांट करणारे नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) हे पहिले सेंटर ठरले आहे. १० सप्टेंबर २०१७ रोजी सुरू झालेल्या या सेंटरमध्ये शनिवारी पुन्हा तीन बालकांवर यशस्वी ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ झाले. आतापर्यंत ‘इम्प्लांट’ झालेल्या रुग्णांची संख्या आठ झाली आहे. यातच दर मंगळवारी विशेष‘ओपीडी’ सुरू केल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. तूर्तास १५ रुग्ण या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती मेयोच्या कान, नाक व घसा (ईएनटी) विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी पत्रपरिषदेत दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय रुग्णालयांमध्ये कॉक्लीअर इम्प्लांट करणारे नागपुरातील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) हे पहिले सेंटर ठरले आहे. १० सप्टेंबर २०१७ रोजी सुरू झालेल्या या सेंटरमध्ये शनिवारी पुन्हा तीन बालकांवर यशस्वी ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ झाले. आतापर्यंत ‘इम्प्लांट’ झालेल्या रुग्णांची संख्या आठ झाली आहे. यातच दर मंगळवारी विशेष‘ओपीडी’ सुरू केल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. तूर्तास १५ रुग्ण या शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत आहेत, अशी माहिती मेयोच्या कान, नाक व घसा (ईएनटी) विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदी यांनी पत्रपरिषदेत दिली.
डॉ. वेदी म्हणाले, उपचार असूनही अनेकांवर आयुष्यभर मूकबधिर अवस्थेत जीवन जगावे लागते. श्रवणदोषावर ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ शस्त्रक्रिया पर्याय ठरत आहे. मेयो रुग्णालयातील ‘ईएनटी’ विभागात ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ सेंटर सुरू झाल्याने याचा फायदा रुग्णांना होत आहे. या इम्प्लांटमुळे शब्द आणि त्याची संरचना त्या मुलाच्या मेंदूपर्यंत थेट जाते. शब्द समजण्यास व बोलण्यास मदत होते. इम्प्लांटसाठी बाळाचा एक ते पाच वर्षापर्यंतचा काळ सर्वोत्तम असतो. ‘इम्प्लांट’नंतर तीन वर्षे ‘स्पीच थेरपी’ द्यावी लागते. त्यानंतर रुग्णाला चांगले बोलता येते. विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयात या सर्वाला सात ते दहा लाखांचा खर्च येतो. परंतु केंद्र सरकारच्या ‘स्कीम आॅफ असिस्टन्स टू डिसेबल पर्सनस् फॉर परचेस’मुळे (एडीआयपी) रुग्णाला एक रुपयाचा खर्च येत नाही. परंतु ही योजना आर्थिक दुर्बल घटकांसाठी आहे. ‘एडीआयपी’ संपूर्ण देशाच्या सेंटरला ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ यंत्र पुरविते. यामुळे यंत्र यायलाच आठ-नऊ महिन्यांचा वेळ लागतो. सध्या १५ रुग्ण प्रतीक्षा यादीत आहे, असेही ते म्हणाले.
शनिवार ४ आॅगस्ट रोजी तीन चिमुकल्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. ही शस्त्रक्रिया प्रसिद्ध ईएनटी सर्जन पद्मश्री डॉ. मिलिंद कीर्तने यांच्या मार्गदर्शनात डॉ. जीवन वेदी यांनी ही शस्त्रक्रिया केली. त्यांना भूलतज्ज्ञ डॉ. सोनाली खोब्रागडे व डॉ. विकास चौधरी यांच्यासह डॉ. रितेश शेळकर व ईएनटी विभागाची चमू, कार्यरत परिचारिका व कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले.
यांच्यावर झाली शस्त्रक्रिया
क्रितीदीपा सरकार (४) रा. चंद्रपूर, रेणुका शिंदे (५) रा. नागपूर व शीतल सोनकुसरे (४) रा. भंडारा या चिमुकल्यांवर शनिवारी कॉक्लीअर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली.
जन्मत:च बाळांची तपासणी
डॉ. वेदी म्हणाले, आपल्याकडे जन्मत:च श्रवण क्षमतेची चाचणी करण्याचे प्रमाण फारच कमी आहे. यामुळे मूकबधिरतेचे प्रमाण मोठे आहे. ते कमी करण्यासाठी मेयोनेही पुढाकार घेतला आहे. रुग्णालयात प्रसूती झालेल्या प्रत्येक बाळाची ईएनटी विभागाकडून श्रवण क्षमतेची चाचणी घेणे सुरू केले आहे.