जिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षाच

By Admin | Published: December 19, 2015 03:03 AM2015-12-19T03:03:40+5:302015-12-19T03:03:40+5:30

प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय असण्याचा नियम आहे. परंतु नागपूर जिल्ह्याला या रुग्णालयाच्या मंजुरीसाठीच २०१३ची वाट पहावी लागली.

Waiting for the District Hospital | जिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षाच

जिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षाच

googlenewsNext

मंजुरीनंतरही निधीची तरतूद नाही : डॉ. आंबेडकर अनुसंधान केंद्रही होऊ शकते जिल्हा रुग्णालय!
सुमेध वाघमारे नागपूर
प्रत्येक जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय असण्याचा नियम आहे. परंतु नागपूर जिल्ह्याला या रुग्णालयाच्या मंजुरीसाठीच २०१३ची वाट पहावी लागली. प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या ८.९० एकर जागेवर हे रुग्णालय उभे राहणार होते. यासाठी २८.५ कोटींचा प्रस्तावही तयार करण्यात आला, मात्र दोन वर्षे होऊनही निधीला प्रशासकीय मंजुरीच मिळाली नसल्याने मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच जिल्हा रुग्णालयाची प्रतीक्षा कधी संपणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
विशेष म्हणजे, राज्याची आर्थिक स्थिती पाहता आणखी काही वर्षे हा निधी मिळण्याची शक्यता कमीच आहे. यावर उपाय म्हणून कामठी रोडमार्गावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्रात जिल्हा रुग्णालय सुरू केल्यास शासनाचा मोठा निधी सोबतच मनुष्यबळाची समस्या सुटू शकते, असे आरोग्य विभागाच्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्हा रुग्णालयाचा प्रमुख हा जिल्हा शल्यचिकित्सक असतो. जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाव्यतिरिक्त जिल्ह्यातील ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयाचेसुद्धा काम पाहतो. जिल्हा शल्यचिकित्सकास विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणीही करावी लागते. यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालय ठिकाणी जिल्हा रुग्णालय स्थापन करणे आवश्यक असते. परंतु दोन वर्षांपर्यंत आरोग्य विभागासोबतच प्रशासन याबाबत गंभीर नव्हते. अखेर नागपुरात १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यास १७ जानेवारी २०१३ रोजी मान्यता मिळाली. रुग्णालयाच्या बांधकामाकरिता प्रादेशिक मनोरुग्णालयाची ८.९० एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली. परंतु २९ सप्टेंबर २०१५ रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यात झालेल्या बैठकीत या रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी आणखी १० एकर जागा उपलब्ध करून देण्यावर चर्चा झाली. या जागेसाठी ३० सप्टेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्यात आले. परंतु नंतर या संदर्भातील हालचाली मंदावल्या. दुसरीकडे बांधकामासाठी लागणाऱ्या २८.५ कोटीच्या निधीला प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव २९ मार्च २०१४ रोजी सहसंचालक, आरोग्य सेवा यांना व विभागाच्या प्रधान सचिवांना पाठविण्यात आला. परंतु अद्यापही मंजुरी मिळाली नाही. या रुग्णालयामुळे रुग्णांना अद्यावत सेवा मिळण्याची आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावर (मेयो) व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयावरील (मेडिकल) कामाचा भार काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता होती. परंतु निधीअभावी या सर्वांवर पाणी फेरले आहे. कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसंधान केंद्र हे ५६८ खाटांचे होणार होते. येथे पदवी व अतिविशेषोपचार अभ्यासक्रम सुरू होणार होते. परंतु मेडिकलशी संलग्न असलेले सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल कार्यरत असताना आणि आयुर्विज्ञान संस्था (एम्स) होऊ घातल्याने या अतिविशेषोपचार रुग्णालयाची गरज नसल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे. त्यांच्या मते, सध्याच्या स्थितीत हे केंद्र बाह्यरुग्ण विभागापर्यंतच मर्यादित आहे. येथे आरोग्य विभागाच्या विविध विषयांचे ११ विशेषज्ञ डॉक्टर आपली सेवा देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या रुग्णालयासंदर्भात सकारात्मक विचार केल्यास १०० खाटांचे जिल्हा रुग्णालय केवळ दोन महिन्यात सुरू होऊ शकते.

Web Title: Waiting for the District Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.