दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाला किटची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:07 AM2021-09-13T04:07:26+5:302021-09-13T04:07:26+5:30
नागपूर : कोरोनाचा संभाव्य तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सिरो सर्वेक्षण सुरू होणार होते, परंतु अद्यापही किट ...
नागपूर : कोरोनाचा संभाव्य तिसऱ्या लाटेच्या नियोजनासाठी सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सिरो सर्वेक्षण सुरू होणार होते, परंतु अद्यापही किट उपलब्धच झाली नाही. यामुळे सर्वेक्षणाचे काम रखडत चालले आहे. विशेष म्हणजे ६,१०० नागरिकांच्या करण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणात पहिल्यांदाच लहान मुलांचाही समावेश करण्यात आला आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयाने दुसऱ्या सर्वेक्षणाचा निर्णय ११ ऑगस्ट रोजी घेतला. यामुळे, १५ दिवसांत सर्वेक्षण सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. सुत्रानूसार, निधीची तरतूद होण्यासाठी व किटची निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यास उशीर झाल्याने सर्वेक्षण लांबले. ‘किट’ची ऑर्डर देण्यात आली असून, ती उपलब्ध झाल्यावर सर्वेक्षण सुरू होणार आहे. गणपती विसर्जनानंतरच सर्वेक्षण सुरू होण्याची शक्यता आहे.
-असे होणार सर्वेक्षण
सिरो सर्वेक्षणासाठी मागील वर्षी चार हजार लोकांचा समावेश करण्यात आला होता. या वर्षी ६,१०० लोक सहभागी करून घेतले जाणार आहेत. यात महानगरपालिकेच्या हद्दीतील १० वेगवेगळ्या झोनमधील प्रत्येकी ४ वॉर्डांतील ७५ ते ८० असे एकूण ३,१०० रक्ताचे नमुने गोळा केले जातील, तर ग्रामीणमधील १३ तहसीलमधून प्रत्येकी एक मुख्यालय व दोन गावांतून एकूण तीन हजार नमुने गोळा केले जाणार आहेत.
- ६ ते १८ वयोगटातील दोन गटांचीही चाचणी
पहिल्यांदाच सिरो सर्वेक्षणात लहान मुलांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. यात ६ ते १२ आणि १३ ते १८ असे दोन गट राहणार आहेत. याशिवाय १९ ते ६० आणि ६०हून अधिक अशा दोन गटांतील नागरिकांची चाचणी केली जाणार आहे.
-कोरोना झालेल्यांचाही समावेश
ज्यांना कोरोना होऊन गेला, ज्यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली, अशा लोकांचाही समावेश या सर्वेक्षणात केला जाणार आहे. परंतु प्रत्येक घरातून एकाच व्यक्तीला यात सहभागी होता येईल.
-१० ते १२ प्रश्नांची द्यावी लागणार उत्तरे
सर्वेक्षणात सहभागी झालेल्यांना १० ते १२ प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहेत. या सर्वेक्षणात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत किती लोकांमध्ये अँण्टिबॉडीज निर्माण झाल्या याचा अभ्यास केला जाणार आहे.
-लवकरच सिरो सर्वेक्षण
दुसऱ्या सिरो सर्वेक्षणाचे नियोजन पूर्ण झाले आहे. सहभागी लोकांच्या रक्ताचे नमुने गोळा करून तपासण्यात येणाऱ्या किटची ऑर्डरही देण्यात आली आहे. यामुळे लवकरच ती उपलब्ध होण्याची शक्यता आहे. किट मिळताच सर्वेक्षण सुरू होईल.
-डॉ. उदय नारलावार, प्रमुख पीएसएम विभाग, मेडिकल