नागपूर मेडिकल कॉलेज इस्पितळाला ‘एनटीओआरसी’ची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 08:29 PM2018-02-19T20:29:29+5:302018-02-19T20:31:28+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेव्हल सेंटर’ (एनटीओआरसी) सुरू करण्यास जानेवारी महिन्यात आरोग्य विभागाने मंजुरी दिली. परंतु मेंदू मृत (ब्रेन डेड) दात्याकडून अवयवदानाची प्रक्रिया सुरू झाली नाही. परिणामी, दानदात्यांअभावी अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत यातना सहन करत असलेल्या रुग्णांना जीवघेण्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (मेडिकल) ‘नॉन ट्रान्सप्लांट आॅर्गन रिट्रायेव्हल सेंटर’ (एनटीओआरसी) सुरू करण्यास जानेवारी महिन्यात आरोग्य विभागाने मंजुरी दिली. परंतु मेंदू मृत (ब्रेन डेड) दात्याकडून अवयवदानाची प्रक्रिया सुरू झाली नाही. परिणामी, दानदात्यांअभावी अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत यातना सहन करत असलेल्या रुग्णांना जीवघेण्या प्रतीक्षेला सामोरे जावे लागत आहे.
मूत्रपिंड (किडनी), फुफ्फुस, यकृत, स्वादूपिंड, हृदय, हृदयाच्या झडपा, आतडी, डोळे, कानाचे ड्रम, त्वचा हे मानवाच्या शरीरातील विविध अवयवदान करून एक ब्रेन डेड (मेंदू मृत) व्यक्ती इतर १० व्यक्तींना नवा जन्म देऊ शकते. नागपूरच्या मेयो व मेडिकलचा विचार केल्यास दर दिवशी एकतरी ‘ब्रेन डेड’ व्यक्तीची नोंद होते. परंतु ‘एनटीओआरसी’ची मंजुरी नसल्याने अशा दात्याकडून अवयव काढता येत नव्हते. मेडिकलशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये २०१६पासून मूत्रपिंड प्रत्यारोपणाला सुरुवात झाल्याने या केंद्राची गरजही भासू लागली होती. याची दखल घेत मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांनी ‘एनटीओआरसी’चा प्रस्ताव सार्वजनिक आरोग्य विभागाला पाठविला. या विभागाने जानेवारी महिन्यात मंजुरी दिली. या शस्त्रक्रियेसाठी ‘ट्रॉमा केअर सेंटर’मध्ये अद्यावत शस्त्रक्रियागृह तयार करण्यात आले. यामुळे मंजुरीच्या आठवडाभरात मेंदू मृतदात्याकडून अवयव घेण्याची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा होती, परंतु दोन महिन्याचा कालावधी होत असतानाही एकाही ब्रेनडेड व्यक्तीकडून अवयवदान हाऊ शकले नाही.
चार वर्षात २८ ब्रेनडेड दात्यांची नोंद
‘ह्युमन आॅर्गन ट्रान्सप्लांट’ कायद्यानुसार प्रत्येक ‘ब्रेन डेड’ व्यक्तीची माहिती ‘झोनल ट्रान्सप्लान्ट कोआॅर्डिनेशन सेंटर’ने (झेडटीसीसी) देणे बंधनकारक आहे. असे असताना २०१३ ते आतापर्यंत केवळ २८ ‘ब्रेन डेड’ दात्याचेच अवयव प्रत्यारोपण होऊ शकले आहे. विशेष म्हणजे, यात मेडिकलमधील केवळ एका रुग्णांची नोंद आहे.
‘ट्रॉमा’मधील अद्यावत शस्त्रक्रियागृहही सज्ज
अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी मेडिकलमध्ये ‘ट्रॉमा केअर सेंटर’ उभारण्यात आले. अपघातातील रुग्णांमध्ये मेंदू मृत व्यक्तीची संख्या मोठी असते. यामुळे ‘ट्रॉमा’मध्येच मेंदू मृत दात्याकडून अवयव काढण्यासाठी अद्यावत शस्त्रक्रियागृह सज्ज करण्यात आले. मेंदू मृत दात्यांसाठी लागणारे व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्याची घोषणाही जिल्हाधिकाºयांनी केली आहे. परंतु या प्रक्रियेला सुरुवातच झाले नसल्याचे सूत्राचे म्हणणे आहे.