परीट समाजाला व्यवसायावरील ग्रहण सुटण्याची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2020 12:22 AM2020-06-11T00:22:10+5:302020-06-11T00:23:36+5:30
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे इतर व्यवसायासह परीट समाजाच्या व्यवसायावरही ग्रहण लागले आहे. अडीच महिन्यापासून काम बंद असून कुठलीही आवक नसल्याने कपडे धुण्याच्या कामावर अवलंबून असलेल्या या समाजाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे व्यवसायाला लागलेले हे ग्रहण कधी सुटेल, ही प्रतीक्षा असून शासनाने समाजाला मदत करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे इतर व्यवसायासह परीट समाजाच्या व्यवसायावरही ग्रहण लागले आहे. अडीच महिन्यापासून काम बंद असून कुठलीही आवक नसल्याने कपडे धुण्याच्या कामावर अवलंबून असलेल्या या समाजाला आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कोरोनामुळे व्यवसायाला लागलेले हे ग्रहण कधी सुटेल, ही प्रतीक्षा असून शासनाने समाजाला मदत करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
बारा बलुतेदार संघटनेचे संजय भिलकर यांनी परीट समाजाच्या अवस्थेबाबत माहिती दिली. लॉकडाऊनपासून परीट समाजाचे काम बंद झाले आहे. उन्हाळा हा परीट व्यवसायासाठीही सीझनचा काळ असतो. लग्न समारंभासाठीे मंगल कार्यालयातील कपडे मोठ्या प्रमाणात येत असतात. मात्र समारंभावर बंदी असल्याने मंगल कार्यालयातील कपडे येणे बंद झाले. दुसरीकडे खासगी रुग्णालयातील कपडे येणेही बंद झाले. सामान्य नागरिकांचे कपडेही येणे थांबले. शासकीय रुग्णालयाचे कपडे येतात पण कंत्राटानुसार काही मर्यादित लोकांना काम मिळते. काही दिवसांपासून शासनाने टाळेबंदीत शिथिलता आणली आणि व्यवसाय सुरू केला, मात्र लोकही भीतीमुळे कपडे द्यायला नकार देत आहेत. त्यामुळे अडीच महिन्यापासून अडचणी कायम आहेत.
नागपूर शहरात परीट समाजाची लोकसंख्या २५ हजाराच्या वर आहे. कर्नाटक सरकारने या व्यावसायिकांना प्रतिमाह ५००० रु. देण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्र शासनानेहीे याच धर्तीवर परीट व्यावसायिकांना मदत करावी, अशी मागणी संघटनेतर्फे संजय भिलकर यांनी केली. तसेच भाड्याच्या खोलीत व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र शासनाने २० लाख कोटींची घोषणा केली, त्याचा लाभही परिटांना मिळाला नसल्याचे सांगत शासनाने समाजाची गंभीरपणे दखल घ्यावी, अशी विनंती त्यांनी केली.