महाराजबागेतील ‘जान’ला जोडीदाराची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 11:46 PM2020-07-20T23:46:05+5:302020-07-20T23:48:34+5:30

गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील पिंजरे सध्या फुल्ल झाले आहेत. या परिस्थितीतही राज्यातील कोणत्याही वन क्षेत्रातून रेस्क्यू केलेला वाघ येथे आणला जाऊ शकतो. गोरेवाडामध्ये वाघ ठेवण्यासाठी जागा नसताना दुसरीकडे मात्र महाराजबागेतील ‘जान’ नावाची वाघीण जोडीदारासाठी व्याकूळ आहे.

Waiting for a partner to go to 'Jaan' in Maharajbag | महाराजबागेतील ‘जान’ला जोडीदाराची प्रतीक्षा

महाराजबागेतील ‘जान’ला जोडीदाराची प्रतीक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देगोरेवाडा बचाव केंद्रात एनटी-१ दाखल : नवा वाघ आल्याने पिंजरे हाऊसफुल्ल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गोरेवाडा वन्यप्राणी बचाव केंद्रातील पिंजरे सध्या फुल्ल झाले आहेत. या परिस्थितीतही राज्यातील कोणत्याही वन क्षेत्रातून रेस्क्यू केलेला वाघ येथे आणला जाऊ शकतो. गोरेवाडामध्ये वाघ ठेवण्यासाठी जागा नसताना दुसरीकडे मात्र महाराजबागेतील ‘जान’ नावाची वाघीण जोडीदारासाठी व्याकूळ आहे. मागील अनेक वर्षांपासून ती एकटीच असून, तिच्या दोन बहिणींपैकी एक ‘ली’ हिला गोरेवाडा केंद्रात ब्रीडिंगसाठी पाठविण्यात आले. तर, दुसरी वाघीण ‘चेरी’ हिची छत्तीसगडमधील काननपेंढरी प्राणिसंग्रहालयात रवानगी करण्यात आली आहे. जानला जोडीदार मिळावा यासाठी महाराजबाग व्यवस्थापन राज्याच्या वन विभागाकडे आणि अन्य प्राणिसंग्रहालयाकडे नर वाघाची मागणी करीत आहे.
गोरेवाडा प्राणी बचाव केंद्रामध्ये बिबट्यांसाठी २०, अस्वलींसाठी ५ आणि वाघांसाठी १० पिंजरे आहेत. गोरेवाडामध्ये ११ जूनला ताडोबा येथून एक वाघ केटी-१ आणि २२ जूनला नागभीडमधून वाघीण आणल्याने ही संख्या वाढून ११ झाली. वाघांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक झाली होती. मात्र केटी-१ चा २२ जूनला आणि नागभीडवरून आणलेल्या वाघिणीचा जुलै महिन्यात मृत्यू झाला. यामुळे सध्या गोरेवाडामध्ये ९ वाघ राहिले आहेत. मात्र एखादा वाघ उपचारासाठी आणल्यावर येथील संख्या वाढणार आहे. दरम्यान, महाराजबागेमध्ये असलेल्या जान या वाघिणीचे वय ११ वर्षांचे झाले आहे. विशेषज्ञांच्या मते, प्रजनन क्षमतेसाठी तिच्याकडे आता फार कमी दिवस आहेत. महाराजबाग व्यवस्थापनाने आजवर मुख्यालय व एफडीसीएमकडे तीन पत्रे लिहून ही स्थिती कळविली आहे. अलीकडेच १६ जूनलाही त्यांनी पत्र लिहून वाघ देण्याची मागणी केली आहे. आपण वारंवार विनंती करीत असल्याचे महाराजबागचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांनी सांगितले.

क्षमतेपेक्षा अधिक वन्यप्राणी
गोरेवाडा येथील प्राणी बचाव केंद्रामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्राणी झाले आहेत. बिबट्यांची संख्या २० वरून २४ झाली आहे. यापैकी मोरगाव येथून आणलेल्या बिबट्याचा २३ जूनला मृत्यू झाला. सध्या २३ बिबट आहेत. अलीकडेच १६ जुलैला अकोल्याच्या पातूर वन परिक्षेत्रामधून आईपासून विभक्त झालेली बिबट्याची चार पिले आणली आहेत. अस्वलांची संख्या १० झाली आहे. यामुळे यातील काही अस्वल आणि बिबट गोरेवाडामध्ये उभारण्यात येत असलेल्या इंडियन सफारी झू क्षेत्रात शिफ्ट करण्याची तयारी केली आहे. यासोबतच उपचारासाठी आणलेल्या हरीण व अन्य प्राण्यांची संख्याही पिंजऱ्यापेक्षा अधिक झाली आहे.

Web Title: Waiting for a partner to go to 'Jaan' in Maharajbag

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ