कन्हान ठाण्याला जागेची प्रतीक्षा
By Admin | Published: August 31, 2015 02:53 AM2015-08-31T02:53:13+5:302015-08-31T02:53:13+5:30
अंदाजे ८० वर्षांपूर्वी पारशिवनी तालुक्यातील पिपरी (कन्हान) येथे पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली होती.
संतोषी त्रिवेदी कन्हान
अंदाजे ८० वर्षांपूर्वी पारशिवनी तालुक्यातील पिपरी (कन्हान) येथे पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली होती. कालांतराने या चौकीचे पोलीस ठाण्यात रूपांतर झाले. आज या पोलीस ठाण्यात अधिकाऱ्यांसह एकूण ६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. त्यांच्यावर कन्हान शहरासह परिसरातील ३५ गावांमधील शासन व सुव्यवस्था कायम ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. असे असले तरी या पोलीस ठाण्याचा कारभार अजूनही किरायाच्या इमारतीतून चालत असून, कर्मचाऱ्यांना शासकीय निवासस्थाने नसल्याने तेही शहरात किरायाने घर घेऊन राहतात.
पूर्वी कन्हानला पिपरी नावाने ओळखले जायचे. येथे ब्रुक बॉण्ड, खंडेलवाल फेरो अलॉय, कानपूर केमिकल्स, पेपर मिल, ह्यूम पाईप यासह अन्य मोठे उद्योग होते. कालांतराने या परिसरात वेकोलिच्या कोळसा खाणी सुरू करण्यात आल्या. त्यामुळे या ठिकाणी रोजगारासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढत गेली. यात परप्रातीयांची संख्या मोठी होती. पिपरी गावाचा विस्तार होत गेल्याने नव्याने वसलेले गाव कन्हान नावाने रूढ झाले. कारण ते कन्हान नदीच्या काठी वसले आहे. पूर्वी पिपरी येथे पोलीस चौकी होती. त्या चौकीचा कारभार कामठी पोलीस ठाण्यातून चालायला. या चौकीत पोलीस कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती होती. कालांतराने गावाची लोकसंख्या वाढत गेली आणि कन्हान येथे पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली. आज या पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक व चार उपनिरीक्षकांसह एकूण ६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. त्यांच्यावर कन्हान शहरासह परिसरातील ३५ गावांमधील नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सोपविली आहे. कन्हान शहराची लोकसंख्या एक लाखाच्या आसपास आहे. पूर्वीचे पोलीस ठाणे कवेलूच्या इमारतीत होते. त्यात हळूहळू सुधारणा होत गेल्या. ठाणेदार रामलखन यादव यांच्या कार्यकाळात ठाणेदारासाठी स्वतंत्र कक्षाची निर्मिती करण्यात आली. ठाणेदार नरेंद्र हिवरे यांर्च्या काळात वेकोलिच्या सीएसआर फंडातून तक्रार नोंदवायला येणाऱ्या नागरिकांसाठी हॉल बांधण्यात आला.