चिचघाटच्या पुनर्वसनाची प्रतीक्षा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:38 AM2021-02-05T04:38:15+5:302021-02-05T04:38:15+5:30

प्रदीप घुमडवार लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : चापेगडी (ता. कुही) गटग्रामपंचायतअंतर्गत येणारे चिचघाट हे गाव गाेसेखुर्द प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात असून, ...

Waiting for the rehabilitation of Chichghat continues | चिचघाटच्या पुनर्वसनाची प्रतीक्षा कायम

चिचघाटच्या पुनर्वसनाची प्रतीक्षा कायम

Next

प्रदीप घुमडवार

लाेकमत न्यूज नेटवर्क

कुही : चापेगडी (ता. कुही) गटग्रामपंचायतअंतर्गत येणारे चिचघाट हे गाव गाेसेखुर्द प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात असून, या गावाच्या चहूबाजूंनी नदी व नाला आहे. गाेसेखुर्द प्रकल्पामुळे या नदी व नाल्यात पाणी तुंबून राहत असल्याने या गावाला दरवर्षी पुराचा फटका बसताे. त्यामुळे या गावाचे पुनर्वसन करणे अत्यावश्यक आहे. मात्र, प्रशासन याबाबत काहीही हालचाली करायला तयार नाही. त्यामुळे या गावाचे पुनर्वसन कधी हाेणार, असा प्रश्नही स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.

चिचघाटची लोकसंख्या ३३० असून, या गावात ८५ कुटुंब वास्तव्याला आहेत. कन्हान नदीच्या तीरावर वसलेल्या या गावाच्या उत्तरेकडून पश्चिम-पूर्व दिशेने कन्हान नदी, दक्षिण-उत्तर दिशेने नाग नदी तर पूर्वेला हत्तीनाला वाहताे. या दाेन्ही नद्या व नाल्याला पूर आल्यास दरवर्षी या गावाचा इतर गावाशी संपर्क तुटताे. एवढेच नव्हे तर, त्याला बेटाचे स्वरूप प्राप्त हाेते. मध्य प्रदेशातील चाैराई धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर रामटेक तालुक्यातील ताेतलाडाेह व पेंच जलाशयातील पाणी पेंच नदीमार्गे कन्हान नदीत येते आणि पुराची व त्यातून हाेणाऱ्या नुकसानीची तीव्रता वाढते. पूर आल्यास गावातील प्रत्येकाचे गृहाेपयाेगी साहित्यासह शेतातील पिके व त्यांच्या गुरांचे प्रचंड नुकसान हाेते.

पुरामुळे गाव व परिसरात साप, विंचू व इतर विषारी प्राणी व कीटकांचा वावर वाढल्याने जीवन जगणे कठीण झाले आहे. गावातील झाडांना साप लोंबकळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आम्ही साेसलेले दु:ख भविष्यात आमच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये म्हणून प्रशासनाने आमच्या गावाचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करावे, अशी मागणी सरपंच शर्मिला मुंडले, उपसरपंच चंद्रशेखर घायवट, माजी सरपंच अमृत जौंजाळ, विठोबा मुंडले, नवनाथ लेंडे, लीलाधर नंदनवार, दीपंकर हिरेखण, ओंकार कंगाली, मनोहर चोपकर, किसन थोटे, हिरालाल कपूर, इंद्रपाल डोणेकर, दुर्योधन मरघडे, अजय बोंद्रे, सुनील जुमडे, नरेश विरुटकर, पंकज थोटे, मोहन मुंडले यांच्यासह नागरिकांनी केली आहे.

...

पुराचा तडाखा

चिचघाटच्या सभाेवताल कन्हान व नाग नदी तसेच हत्तीनाला असून, या दाेन्ही नद्या व नाला वैनगंगा नदीत विलीन हाेतो. याच नदीवर गाेसेखुर्द प्रकल्प असून, दाेन्ही नद्या व नाल्यात पावसाळ्यामध्ये माेठ्या प्रमाणात पाणी तुंबून राहते. त्यामुळे या गावाला दरवर्षी बेटाचे स्वरूप प्राप्त हाेते. या गावाला सन १९४२, १९६२, १९७५, १९७९, १९९४, २०१३ व २०२० मध्ये पुराचा जबर तडाखा बसला आहे. या प्रत्येक पुराच्यावेळी चिचघाट उद्ध्वस्त झाले हाेते.

...

बचाव पथकाची मदत

२९ व ३० ऑगस्ट २०२० राेजी कन्हान नदीला आलेल्या महापुराने संपूर्ण गाव वेढले होते. त्यावेळी पाण्याच्या पातळीत दाेन फुटाने वाढ झाली असती तर अख्खे गाव ग्रामस्थासह वाहून गेले असते. गावात अडकलेल्या ग्रामस्थांना सुखरूपस्थळी हलविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला एनडीआरएफ व एसडीआरएफच्या जवानांची मदत घ्यावी लागली हाेती. त्यामुळे या गावाचे तातडीने पुनर्वसन करण्याचा प्रस्तावही जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला. परंतु, प्रशासनाने त्यावर अद्यापही सकारात्मक निर्णय घेतला नाही.

Web Title: Waiting for the rehabilitation of Chichghat continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.