कंत्राटी आराेग्य कर्मचाऱ्यांना वेतनाची प्रतीक्षाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 04:09 AM2021-09-27T04:09:45+5:302021-09-27T04:09:45+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क भिवापूर : स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोविड केअर सेंटरमध्ये काेराेनाबाधित रुग्णांच्या आराेग्याची काळजी घेणाऱ्या कंत्राटी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
भिवापूर : स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोविड केअर सेंटरमध्ये काेराेनाबाधित रुग्णांच्या आराेग्याची काळजी घेणाऱ्या कंत्राटी आराेग्य कर्मचाऱ्यांच्या सेवाकार्याचा सर्वत्र गाैरव झाला. परंतु या कर्मचाऱ्यांना आता २० दिवसांच्या वेतनासाठी आराेग्य विभागाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. इकडून पत्र यायचे आहे, तिकडून पैसे यायचे आहे, अशा उत्तराशिवाय त्यांच्या हाती काहीच लागले नाही. धाेका पत्करत सेवा देऊनसुद्धा वेतनासाठी प्रतीक्षाच करावी लागत असल्याने प्रशासनाची ही भूमिका काेविड याेद्धांच्या सेवाकार्याचा अवमान करणारी ठरत आहे.
भिवापूर येथे काेविड केअर सेंटर सुरू झाल्यानंतर तेथे बहुतांश कर्मचाऱ्यांची कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केली गेली. अल्प मानधनावर या कर्मचाऱ्यांनी काेराेनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत रुग्णसेवा दिली. मात्र दुसरी लाट ओसरताच या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्तीचे आदेश देण्यात आले. या विराेधात कर्मचाऱ्यांनी आंदाेलनही केले हाेते.
१ ऑगस्टला कार्यमुक्त केल्यानंतर २० ऑगस्टपर्यंत या कर्मचाऱ्यांनी सेवा दिली. मात्र काेविड सेंटरमधील चार परिचारिका, एक प्रयाेगशाळा तंत्रज्ञ अशा पाच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे २० दिवसाचे वेतन रखडले आहे. हे वेतन मिळविण्यासाठी कर्मचारी आराेग्य विभागाला साकडे घालत आहेत. परंतु ग्रामीण रुग्णालय व तालुका आराेग्य विभाग केवळ एकमेकांकडे बाेट दाखवून जबाबदारी झटकत आहे. दुसरीकडे जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आराेग्य अधिकारी यांच्याकडून याबाबत पत्र मिळाले नसल्याचेही कर्मचाऱ्यांना सांगितले जात आहे. याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डाॅ. दर्शना गणवीर यांच्याशी संपर्क साधला असता, हाेऊ शकला नाही.
.......
तर पुन्हा सेवा देणार काय?
आरोग्य सेवा देण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेले सर्वत्र कंत्राटी कर्मचारी काेराेनापूर्वी कुठे ना कुठे खासगी हॉस्पिटलमध्ये कार्यरत हाेते. काेराेना काळात आरोग्य विभागात मनुष्यबळाचा अभाव होता. त्यामुळे वेगवेगळी प्रलाेभने दाखवून या कर्मचाऱ्यांना कंत्राटी तत्त्वावर कोविड सेंटरमध्ये नियुक्त करण्यात आले. काेराेना संकटकाळात सेवाभाव कधी ना कधी कामात येईल, या अपेक्षेने कर्मचारी सेवा देण्यास तयार झाले. मात्र काेराेना नियंत्रणात येताच त्यांना अनुभव प्रमाणपत्र, सत्कार आणि अल्प मानधन देत कार्यमुक्त केले. हा कटू अनुभव पाहता, संभाव्य तिसऱ्या लाटेत पुन्हा शासकीय विभागात हे कर्मचारी कंत्राटी सेवा देणार काय, हा प्रश्नच आहे.