दोन वर्षांपासून विद्यार्थी रेल्वे भरतीच्या प्रतीक्षेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:07 AM2021-06-01T04:07:09+5:302021-06-01T04:07:09+5:30
नागपूर : रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाद्वारे फेब्रुवारी २०१९मध्ये १ लाख ३९ हजार ४९ पदांकरिता जाहिरात काढली होती. त्यासाठी ...
नागपूर : रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डाद्वारे फेब्रुवारी २०१९मध्ये १ लाख ३९ हजार ४९ पदांकरिता जाहिरात काढली होती. त्यासाठी देशभरातून २.५ कोटी उमेदवारांनी अर्ज केले होते. परंतु रेल्वे प्रशासनाला ही भरती प्रक्रिया अजूनही राबविता आली नाही. त्यामुळे विद्यार्थी रेल्वे भरतीच्या प्रतीक्षेत आहेत.
रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डातर्फे एनटीपीसी (नॉन टेक्निकल पाॅप्युलर कॅटॅगिरी) आणि आर. आर. सी. (रेल्वे रिक्रुटमेंट सेल) ने ग्रुप-डी पदाच्या परीक्षेकरिता खुल्या प्रवर्गातील विद्यार्थांकडून ५०० रुपये, तर मागासवर्गीय विद्यार्थांकडून २५० रुपये परीक्षा शुल्क आकारले होते. भरतीसंदर्भातील कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने मागील वर्षी विद्यार्थांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त करून ट्विटरद्वारे हॅशटॅगच्या माध्यमातून आंदोलन केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्र सरकार आणि रेल्वे प्रशासन सतर्क झाले आणि त्यांनी ‘एनटीपीसी’ची परीक्षा जाहीर करून २८ डिसेंबर २०२०ला परीक्षेचा पहिला टप्पा सुरू केला. त्यानंतर कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे काही टप्पे रद्दही करण्यात आले. परंतु आर. आर. सी.च्या ग्रुप-डी भरतीसंदर्भात कुठलेही नवीन नोटीफिकेशन अजूनही देण्यात आले नाही. सध्या आर. आर. बी.च्या साईटवर काहीच अपडेटेड नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात कुठलीही नवीन माहिती मिळत नाही. दोन वर्षे उलटूनही परीक्षा झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थी चिंतेत आहेत. पदभरतीची जाहिरात येऊन दोन वर्षे लोटली. रेल्वे प्रशासनामार्फत कुठलीही प्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. विद्यार्थ्यांना आणखी किती काळ वाट पाहावी लागणार आहे. भरतीसंदर्भातील लवकरात लवकर निर्णय घेऊन प्रक्रिया राबवावी, अशी मागणी रक्षा टेंभुर्णे, इशांत सहारे, अमोल गणवीर, सन्नी दमके, धीरज आकरे, अमन रामटेके, आशिष आवळे, निखिल रामटेके, शशिकांत राऊत, शिवम घरडे, रोहित नंदेश्वर, आशिष राऊत, चिंटू मेश्राम, उमेश डोंगरे, नीलेश नंदेश्वर, आतीष नाईक, पियुष मेश्राम या परीक्षार्थींनी केली आहे.
- जाहिरात निघाल्यापासून आतापर्यंत या भरती प्रक्रियेत विद्यार्थ्यांना नियुक्ती देणे अपेक्षित होते. परंतु रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्या भरती प्रक्रियेला तीन वर्षे लागत असतील तर त्या भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण होते. रेल्वे प्रशासनाने भरती प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे, अन्यथा आंदोलनाकरिता आमची तयारी आहे.
-सुबोध चहांदे, विद्यार्थी प्रतिनिधी