वेकोलि महानिर्मितीला आवश्यक तेवढा कोळसा पुरविण्यास तयार : ऊर्जामंत्र्यांनी घेतली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 11:00 PM2019-05-27T23:00:19+5:302019-05-27T23:01:41+5:30

राज्यातील महानिर्मितीच्या खापरखेडा, कोराडी, नाशिक, भुसावळ, चंद्रपूर, पारस आणि परळी वीजनिर्मिती केंद्रात पुरेसा कोळसा साठा उपलब्ध असून वेस्टर्न कोल फिल्डस (वेकोलि) महानिर्मितीला आवश्यक तेवढा कोळसा पुरविण्यास तयार असल्याची कबुली वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यांनी सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली. याच बैठकीत कोळसा चोरीबाबत पोलिसांची मदत घेऊन कारवाई करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले.

Wakeoli is ready to provide the much needed coal for Mahan-jyotina: The Energy Minister took the meeting | वेकोलि महानिर्मितीला आवश्यक तेवढा कोळसा पुरविण्यास तयार : ऊर्जामंत्र्यांनी घेतली बैठक

वेकोलि महानिर्मितीला आवश्यक तेवढा कोळसा पुरविण्यास तयार : ऊर्जामंत्र्यांनी घेतली बैठक

Next
ठळक मुद्देराज्यातील वीज निर्मिती केंद्रांकडे पुरेसा कोळसा साठा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील महानिर्मितीच्या खापरखेडा, कोराडी, नाशिक, भुसावळ, चंद्रपूर, पारस आणि परळी वीजनिर्मिती केंद्रात पुरेसा कोळसा साठा उपलब्ध असून वेस्टर्न कोल फिल्डस (वेकोलि) महानिर्मितीला आवश्यक तेवढा कोळसा पुरविण्यास तयार असल्याची कबुली वेकोलिचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजीव रंजन मिश्रा यांनी सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिली. याच बैठकीत कोळसा चोरीबाबत पोलिसांची मदत घेऊन कारवाई करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दिले.
या बैठकीला खनिज महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. आशिष जयस्वाल, वेकोलिचे प्रमुख अधिकारी, महानिर्मितीचे कार्यकारी संचालक बुरडे व अन्य उपस्थित होते. मागील २०१४-१५ मध्ये महानिर्मितीला ३९ दशलक्ष टन कोळसा वेकोलिने पुरवला होता. यंदा ४१ दशलक्ष टन कोळसा पुरविण्यात आला असून या वर्षाच्या अखेरपर्यंत हा कोळसा पुरवठा ५६ दशलक्ष टनापर्यंत नेण्याचा वेकोलिचा प्रयत्न आहे. रेल्वेद्वारे होणारा कोळसा पुरवठा लवकर होत नाही. परिणामी वीजनिर्मिती केंद्राच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो. रस्ता वाहतुकीने मात्र कोळसा लवकर पोहोचतो. कोराडी येथे रेल्वेने कोळसा पुरवण्यात अनेक अडचणी येत आहेत. म्हणून रस्ता वाहतुकीने कोळसा पुरवठा केला जातो. आतापर्यंत रेल्वेनेच अधिकाधिक कोळसा पुरविण्यात आला. येत्या ३० जूनपर्यंत जास्तीत जास्त कोळसा महानिर्मितीच्या केंद्रांना पुरविण्याचे निर्देशही मिश्रा यांनी दिले.
वेकोलिकडून रेल्वे, रस्ता वाहतूक आणि रोप वे द्वारे तिमाहीत ९५ दशलक्ष टन कोळसा पुरविण्याचे लक्ष्य ठरविण्यात आले होते. आतापर्यंत हे लक्ष्य पूर्ण झालेले नाही. २०१८-१९ मध्ये पहिल्या तिमाहीत ८४.२४ दशलक्ष टन, दुसऱ्या तिमाहीत ७४.८३ दशलक्ष टन, तिसऱ्या तिमाहीत ८७.५० दशलक्ष टन कोळसा पुरविण्यात आला. दक्षिण पूर्व कोल लिमिटेड, महानदी कोल लिमिटेड, दक्षिण मध्य कोल लिमिटेडच्या तुलनेत वेस्टर्न कोल फिल्डकडून अधिक कोळसा महानिर्मितीला पुरविण्यात आला आहे. आजपर्यंत खापरखेडा केंद्रात ४ दिवसांचा कोळसा साठा, कोराडी ४ दिवसांचा, नाशिकला ३ दिवसांचा, भुसावळला १८ दिवसांचा, चंद्रपूरला १२ दिवसांचा, पारसला ७ दिवसांचा तर परळीला २२ दिवसांचा कोळसा साठा उपलब्ध आहे.
चंद्रपूर आणि कोराडी-खापरखेडा या विद्युत निर्मिती केंद्रांना अनुक्रमे ४५,१०० टन आणि ३३.६०० टन कोळसा दररोज लागतो. दक्षिण मध्य, महानदी, दक्षिण पूर्व कोल लिमिटेडच्या तुलनेत वेकोलिचा कोळसा स्वस्त आणि दर्जा चांगला असलेला असण्याचा दावा मिश्रा यांनी केला. जर महानिर्मितीने सर्व कोळसा वेकोलिकडूनच घेण्याचा निर्णय घेतला तर वेकोलिने कोळसा पुरविण्याची जबाबदारी घेतली. असे असले तर बाजारात ज्या कंपनीचा कोळसा स्वस्त उपलब्ध आहे, त्या कंपनीकडूनच कोळसा घेण्याचा निर्णय महानिर्मितीतर्फे घेतला जात असतो. दक्षिण मध्य कोल लिमिटेडच्या तुलनेत वेकोलिचा कोळसा स्वस्त असल्याचा दावाही मिश्रा यांनी यावेळी केला. जर वेकोलिचा कोळसा स्वस्त पडत असेल तर महाग कोळसा घेणे बंद करून वेकोलिचा कोळसा घेण्याचे निर्देश ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी महानिर्मितीच्या अधिकाऱ्यांना दिले.
कोराडी आणि खापरखेडा या केंद्रांना वेकोलिच्या भानेगाव आणि सिंगोरी या खाणीतून पुरेसा कोळसा पुरविण्याची तयारी वेकोलिने दाखविली आहे. तसेच गोंडेगाव आणि इंदर या खाणीतही कोळसा उपलब्ध असून तेथूनही कोळसा पुरविण्याची तयारी वेकोलिची आहे.

Web Title: Wakeoli is ready to provide the much needed coal for Mahan-jyotina: The Energy Minister took the meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.