वऱ्हाडा गावाची ‘हाॅटस्पाॅट’कडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:07 AM2021-03-20T04:07:31+5:302021-03-20T04:07:31+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क पारशिवनी : काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यात पारशिवनी तालुक्यात १ ते १८ मार्च दरम्यानच्या काळात एकूण ४६९ ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
पारशिवनी : काेराेना संक्रमणाच्या दुसऱ्या टप्प्यात पारशिवनी तालुक्यात १ ते १८ मार्च दरम्यानच्या काळात एकूण ४६९ काेराेना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. यात वऱ्हाडा (ता. पारशिवनी) येथील १०९ रुग्णांचा समावेश आहे. काेराेना संक्रमण नियंत्रणात न आल्यास या गावाची ‘हाॅटस्पाॅट’कडे वाटचाल सुरू झाल्याचे दिसून येते.
तालुक्यात गुरुवारी (दि. १८ मार्च) ६३ रुग्णांची नाेंद करण्यात आली हाेती. यात पारशिवनी शहरातील नऊ रुग्णांचा तर प्राथमिक आराेग्य केंद्र डाेरली अंतर्गत नऊ, दहेगाव (जाेशी) प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत २१, साटक प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत दाेन तर कन्हान प्राथमिक आराेग्य केंद्रांतर्गत ३१ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आजवर ४१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, हा आकडा ५५ असल्याची माहिती जाणकार व्यक्तींनी दिली. कारण, ज्या रुग्णांची कागदपत्रे प्राथमिक आराेग्य केंद्राकडे पाेहाेचतात, त्यांची नाेंद केली जाते. मात्र, काहींचे कागदपत्रेच पाेहाेचली नसल्याने त्यांची नाेंद करण्यात आली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सध्या तालुक्यात ४२८ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. यात वऱ्हाडा गाव अग्रस्थानी आहे. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने उपाययाेजना करणे तसेच नागरिकांनी त्यांचे काटेकाेर पालन करणे गरजेचे आहे. प्रशासनाने पारशिवनी शहरातील दुकानदार, भाजीपाला व फळ विक्रेत्यांची काेराेना चाचणी अनिवार्य केली हाेती. मात्र, कुणीही याकडे सकारात्मक दृष्टिकाेनातून बघितले नाही. त्यातच काही व्यापाऱ्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांनी टेस्ट करण्यास प्राधान्य दिले. या काळात त्यांच्या कुटुंबीयांसह इतरांच्या संपर्कात येणे काेराेना संक्रमणाच्या पथ्यावर पडते. यात बहुतेकांचे रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. शिवाय, शहरातील दाेन व्यापाऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
...
शिक्षकांसह विद्यार्थी पाॅझिटिव्ह
नवेगाव (खैरी) येथील जवाहर नवाेदर विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक असे एकूण २७ जणांचे रिपाेर्ट पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे येथील रुग्णांची संख्या ३० झाली असून, यातील काहींवर खासगी व काहींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पारशिवनी येथील ४२ वर्षीय फळ विक्रेत्याचा काेराेनामुळे गुरुवारी (दि. १८ मार्च) मृत्यू झाला. पारशिवनी शहर व तालुक्यातील बहुतांश व्यापारी व दुकानदार कामठी व नागपूर शहरातील व्यापारी व दुकानदारांच्या संपर्कात येत असल्याने रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.