२० किलोमीटर फिरलो, एकाच ठिकाणी दिसले पोलीस; पोलीस आयुक्तांची तंबी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 11:22 AM2021-07-01T11:22:23+5:302021-07-01T11:23:03+5:30
Nagpur News शहरात २२५ पेक्षा अधिक गस्तीची वाहने उपलब्ध आहेत. ही वाहने कुठेच दिसली नाहीत. भविष्यात असा अनुभव आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, या शब्दांत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ठाणेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तंबी दिली.
जगदीश जोशी
नागपूर: मी २० किलोमीटर शहरात फिरलो, फक्त एकाच ठिकाणी वाहतूक शाखेची महिला कर्मचारी दिसली, ही खेदाची बाब आहे. शहरात २२५ पेक्षा अधिक गस्तीची वाहने उपलब्ध आहेत. ही वाहने कुठेच दिसली नाहीत. भविष्यात असा अनुभव आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, या शब्दांत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ठाणेदार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तंबी दिली.
कोरोनाच्या प्रादुर्भावात डेल्टा व्हायरस प्रभावी झाल्यामुळे प्रतिबंध पुन्हा वाढविण्यात आले आहेत. दुपारी ४ नंतर बाजार बंद करण्याचे निर्देश आहेत. या निर्देशाचे सक्तीने पालन करण्यासाठी पोलिसांची महत्त्वाची भूमिका आहे. रविवारी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी तत्त्वाच्या भागांचे अचानक निरीक्षण केले. जवळपास २० किलोमीटर परिसरात पोलीस आयुक्तांना पोलीस कर्मचारी दिसले नाहीत. केवळ कामठी मार्गावर ऑटोमोटिव्ह चौकात महिला कर्मचारी दिसली. हे पाहून पोलीस आयुक्तांनी मंगळवारी सायंकाळी ठाणेदार व वरिष्ठ अधिकाऱ्यांना ऑन एअर फटकारले.
त्यांच्या मते २० किलोमीटर परिसरात एकाच ठिकाणी पोलीस कर्मचारी दिसणे चिंताजनक आहे. गस्त, नाकाबंदी, आरोपींचा तपास आणि धरपकड या कामात हलगर्जीपणा व्हायला नको. ४ वाजता दुकाने बंद झाली पाहिजेत. नागरिकांना ये-जा करण्यासाठी एक तासाचा वेळ दिला जाऊ शकतो. सायंकाळी ५ ते सकाळी ७ दरम्यान संचारबंदी राहील. सायंकाळी ५ नंतर विनाकारण फिरताना दिसणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी.
पोलीस आयुक्तांनी ठाणेदारांना हॉटेल, बार, रेस्टॉरंट, आमलेट आणि चायनीजचे ठेले सुरू राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्याची कडक शब्दांत सूचना केली. या ठिकाणी गर्दी दिसल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, रस्त्यावर पोलीस दिसले पाहिजे. कोणत्याही घटनास्थळावर पोहोचण्याचा रिस्पॉन्स टाइम कमी झाला पाहिजे. डीसीपी आणि एसीपी यांनी स्वत: नाकाबंदी पॉइंटची निगराणी करून, त्यास प्रभावी करायला पाहिजे. महत्त्वाच्या नाकाबंदी पॉइंटवर अधिकाऱ्यांना तैनात करायला हवे.
त्यांनी वाहतूक शाखेचा समाचार घेताना सांगितले की, वाहतूक शाखेचे ६०० कर्मचारी रस्त्यावर तैनात राहतात. त्यांनी सुरक्षित अंतर, मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. अमितेश कुमार यांनी बिट मार्शलचे लोकेशन तसेच मूव्हमेंटची नियमित देखरेख करण्याचे निर्देश दिले.
.........