उपकालव्यावरील पुलाची भिंत खचली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:09 AM2021-05-12T04:09:02+5:302021-05-12T04:09:02+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क रामटेक : भरधाव ट्रकने जाेरात धडक दिल्याने काचूरवाही-मसला मार्गावरील उपकालव्याच्या पुलाची भिंत खचली आहे. या ठिकाणी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
रामटेक : भरधाव ट्रकने जाेरात धडक दिल्याने काचूरवाही-मसला मार्गावरील उपकालव्याच्या पुलाची भिंत खचली आहे. या ठिकाणी पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी थाेडे वळण दिले असल्याने या पुलाला व त्याच्या भिंतीला विशेष महत्त्व आहे. मात्र, या भिंतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष केले आहे.
पेंच जलाशयाचा डावा कालवा रामटेक तालुक्यातून माैदा तालुका मार्गे भंडारा जिल्ह्यात गेला आहे. या कालव्याचे पाणी रामटेक तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळावे म्हणून या मुख्य कालव्याला उपकालवा (मायनर) जाेडला आहे. यातील एक उपकालवा रामटेक तालुक्यातील काचूरवाही-मसला राेडला छेदून गेला असल्याने त्यावर छाेटा पूल तयार केला आहे. उपकालव्यातील पाण्याचा दाब नियंत्रित करण्यासाठी या पुलाजवळ पाण्याच्या प्रवाहाला थाेडे वळण दिले आहे. काही दिवसांपूर्वी भरधाव ट्रकने त्या उपकालव्यावरील पुलाच्या भिंतीला धडक दिली आणि भिंत खचली. त्यामुळे भिंतीच्या अपशेषासाेबतच मुरूम, दगड उपकालव्यात पडल्याने पाण्याचा वळण मार्ग बुजल्यागत झाला आहे.
सध्या पाणी साेडण्यात न आल्याने हा उपकालवा काेरडा आहे. मात्र, त्यात पाणी साेडल्यानंतर दाब नियंत्रणाची समस्या निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे या प्रकाराबाबत चरण गाेल्हर, बुधा वासनिक यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी पाटबंधारे विभागाच्या रामटेक कार्यालयाला सूचना देत पावसाळ्यापूर्वी ही भिंत दुरुस्त करण्याची तसेच उपकालव्याची साफसफाई करण्याची मागणी केली. परंतु, या मागणीकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे. आगामी खरीप हंगामात शेवटच्या टाेकावरील शेताला पाणी मिळावे म्हणून ही दुरुस्ती व साफसफाई तातडीने करावी, अशी मागणीही काचूरवाही व मसला येथील शेतकऱ्यांनी केली आहे.