भिंत झाली फळा, फुटपाथ झाली शाळा!
By admin | Published: March 18, 2016 03:01 AM2016-03-18T03:01:13+5:302016-03-18T03:01:13+5:30
गुड इव्हिनिंग सर! माय नेम इज मनीषा. तुम्ही म्हणाल कोण आहे मनीषा? तुटक्या इंग्रजीत बोलते.
लहानग्यांना शिक्षणाचा लळा :
गळतीवर विधायक उपाय
जितेंद्र ढवळे नागपूर
गुड इव्हिनिंग सर! माय नेम इज मनीषा. तुम्ही म्हणाल कोण आहे मनीषा? तुटक्या इंग्रजीत बोलते. मनीषा लाल ही फुटपाथ शाळेत शिकते. कोणाशी कसे बोलायचे? कसे राहायचे? ही तिला शिकविले जात आहे. मनीषाला वडील नाही. आई हॉटेलमध्ये भांडी धुते. दिवसभर आई दिसत नाही. पण पहिल्या वर्गातील मनीषा आज मॅनर्सचे धडे गिरवीत आहे. अभ्यासाला ना म्हणणाऱ्या मनीषाला शाळेचा लळा लागला आहे. वर्गात मनीषाच्या शेजारी बसलेल्या महिमाही जन गण मन... म्हणते. महिमाचे वडील लग्नमंडपासमोर फुगे विकतात. रूपाही वन, टू, थ्री, फोर म्हणू लागली आहे. ती ‘खऱ्या’ शाळेत जात नाही!
मनीषा, महिमा, रूपा, अजय, रूपेश आणि ओम गरिबांची ही मुले. झोपडी त्यांचे वैभव. अतिक्रमण कारवाई झाली की पुन्हा रस्त्यावर. शाळेत जाण्यासाठी स्कूल बस नाही. दुपारचा टिफिन नाही. या मुलांना शाळेतून आल्यावर मम्मीकडून सुकामेवाही मिळत नाही. पण या मुलांसाठी राजभवनची भिंत फळा झाली आहे आणि फुटपाथ त्यांची शाळा झाली आहे. ही शाळा रोज सायंकाळी ५ वाजता भरते. शाळेला सुरुवात होते ती ‘इतनी शक्ती हमें दे ना दाता...’या प्रेरणा गीतापासून.
रस्त्यावर जाणाऱ्या-येणाऱ्यांच्या कानावर या मुलांचा बडबड गीतांचा गोड आवाज पडतो तेव्हा संवेदनशील मनाचा ब्रेकही काही क्षणासाठी तिथे लागतो.
स्मार्ट होऊ पाहणाऱ्या नागपुरातील मुलेही स्मार्ट व्हावीत अशी सरकारची इच्छा आहे. पण आमच्या यंत्रणा आजही कागदावरच्या सर्वेत अडकल्या आहेत. पण ‘उपाय’ या स्वयंसेवी संस्थेने शाळेतील मुलांची गळती रोखण्यासाठी फुटपाथ शाळेचा विधायक उपाय शोधला आहे. सहा मुले का होईना गुरुजी त्यांची रोज हजेरी घेतात. उशिरा आला की त्यामागचे कारण समजून घेतात. बोटाची नखे आणि हात स्वच्छ आहे की नाही, हे आधी वर्गात आल्यावर पाहिले जाते. फुटपाथवरील या शाळेचे शिक्षकही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. तेही या मुलांत रमले आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी कसे दिसत होते? ज्या आंबेडकरांनी वंचितांच्या हक्कासाठी घटनेत शिक्षणाचा अधिकार सांगितला ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत? १०० रुपयाच्या नोटवर दिसणारे हे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहे. ज्यांनी आम्हाला स्वातंत्र्य मिळवून दिले, अशी ओळख या मुलांना चित्रांच्या माध्यमातून करून दिली जाते.
फुटपाथवर जीवन जगणाऱ्या या मुलांसोबत राहून विपरीत परिस्थितीत जीवन जगण्याचे कौशल्य मी शिकतो आहे. यांना शिक्षणाची आस आहे, पण आधार नाही. मी माझे कॉलेज करून तीन तास रोज या मुलांना शिकवतो.
- निखील ढोरे, शिक्षक,
माऊंट रोड फुटपाथ शाळा