५४ कोटींच्या इमारतीच्या भिंती झाल्या लाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:11 AM2021-09-06T04:11:44+5:302021-09-06T04:11:44+5:30

नागपूर : गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) रुग्णांच्या सोयीसाठी ५४ ...

The walls of a building worth Rs 54 crore turned red | ५४ कोटींच्या इमारतीच्या भिंती झाल्या लाल

५४ कोटींच्या इमारतीच्या भिंती झाल्या लाल

Next

नागपूर : गरीबच नाही तर सामान्यांसाठी आधार ठरलेल्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने (मेयो) रुग्णांच्या सोयीसाठी ५४ कोटी रुपये खर्चून २५० खाटांचे सर्जिकल कॉम्प्लेक्स उभारले. परंतु रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांसह कर्मचाऱ्यांनी खर्रा, गुटख्याच्या पिचकऱ्यांनी भिंती लाल केल्या आहेत. जागोजागी थुंकणाऱ्यावर कारवाई कधी, असा प्रश्न येथील डॉक्टर, परिचारिकांनी उपस्थित केला आहे.

मेयोच्या पायाभूत गैरसोयींवर तत्कालीन ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ (एमसीआय) दरवर्षी त्रुटी काढून कोंडी करीत असल्याने अखेर शासनाने २०१७ मध्ये २५० खाटांची अद्यायावत इमारत उभी केली. चार मजलीच्या या इमारतीला ‘सर्जिकल कॉम्प्लेक्स’ असे नाव दिले. या कॉम्प्लेक्समधून जनरल सर्जरी विभागासह, अस्थिव्यंगोपचार विभाग, कान, नाक, व घसा विभाग (ईएनटी) व नेत्र रोग विभागाच्या कामकाजाला सुरुवात झाली. सुरुवातीला या देखण्या इमारतीची चर्चाही झाली. परंतु वर्षभरातच ही इमारत घाणीच्या विळख्यात सापडली. याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच मुख्य प्रवेद्वारावर सुरक्षा रक्षकांनी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या खिशातील खर्रा, गुटखा जप्त करणे सुरू केले. यामुळे घाण पसरविणाऱ्यांवर मर्यादा आली होती. मार्च २०२० पासून कोरोनाला सुरुवात होताच हे कॉम्प्लेक्स ‘डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल’मध्ये रुपांतरित झाले. यामुळे हॉस्पिटलमधील नातेवाईकांची गर्दी कमी झाली. परंतु आता मागील तीन महिन्यापासून पुन्हा ‘नॉन कोविड’च्या रुग्णांना कॉम्प्लेक्समध्ये भरती केले जाऊ लागल्याने पुन्हा रुग्णालाच्य भिंती, कोपरे खर्रा व गुटख्याच्या पिचकाऱ्याने रंगू लागले आहेत.

-चौथ्या मजल्यावरून खाली मारतात पिचकारी

काही रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि कर्मचारीसुद्धा चौथ्या मजल्यावरून खर्रा, गुटखा खाऊन भिंतीवर पिचकारी मारतात. यामुळे खालपर्यंत या भिंती लाल झाल्या आहेत. तर काही नातेवाईक उघड्यावर तर काही वॉर्डातील खिडकीतून बाहेर कचरा टाकत असल्याने जागोजागी घाण पसरत आहे.

-सुरक्षा रक्षकांनी घ्यावी जबाबदारी

मेयोच्या सुरक्षेची जबाबदारी जवळपास ७० सुरक्षा रक्षकांवर आहे. आपल्या तीन पाळीत ते सेवा देतात. यांनी पिचकाऱ्या मारणाऱ्यांवर कारवाई करणे सुरू केल्यास, रुग्णालयाच्या आत खर्रा, पान, गुटखा घेऊन जाणाऱ्यांवर प्रतिबंध आणल्यास घाणीसोबतच आजार पसरणार नाही, असे मत काही डॉक्टरांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

Web Title: The walls of a building worth Rs 54 crore turned red

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.