नॉर्थ कॅनलच्या भिंती तुटल्या, उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यांमध्ये दुर्गंधी
By मंगेश व्यवहारे | Published: February 20, 2023 07:15 PM2023-02-20T19:15:16+5:302023-02-20T19:15:51+5:30
डुकरांचा सुळसुळाट, विषारी जीवजंतूची भिती : जरा आमच्या भागाकडेही लक्ष द्या, स्थानिकांची प्रशासनाकडे मागणी
नागपूर : जी-२० च्या परिषदेसाठी शहरातील काही भागात सौंदर्यीकरणाचे काम लक्ष वेधून घेत आहे. पण या कामावरूनच शहरातील काही वस्त्यांनी प्रशासनाकडे बोट दाखविले आहे. उत्तर नागपुरातून जाणाऱ्या नॉर्थ कॅनेलच्या भिंती तुटल्या आहे. त्यामुळे अनेक वस्त्यांमध्ये दूर्गंधी पसरली आहे. डुकरांचा सुळसुळाट व विषारी जीवजंतूची भिती नागरीकांमध्ये आहे. त्यामुळे येथील नागरीकांनी जरा आमच्या भागाकडेही लक्ष द्या, अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.
उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक ६ मधून गेलेला नॉर्थ कॅनलच्या भिंती विविध ठिकाणी तुटलेल्या आहे. भिंती तुटल्यामुळे प्रशासनाने तात्पुरते टीन लावून ठेवले आहे. तुटलेल्या भिंतीमुळे पंचशीलनगर, ताजनगर, खोब्रागडेनगर, आदर्शनगर, खंतेनगर, बंदेनवाजनगर वस्त्या दुर्गंधीने पीडित आहे. कॅनलमध्ये डुकरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट आहे. किटक, जीवजंतू , विषारी सापांमुळे काठावर राहणाऱ्यांच्या जीवाला हाणी होऊ शकते. भिंती तुटल्याने तातपुरते टीन लावले आहे. तुटलेल्या भिंतीमुळे रस्ता अरुंद झाला आहे. वाहन चालकांचे दूर्लक्ष झाल्यास वाहने नाल्यात पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नॉर्थ कॅनलच्या भिंती बांधून लोकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे, अशी मागणी स्थानिक लोकांची आहे.
- आमच्या भागातही जी-२० अंतर्गत काम करा
नाल्याच्या भिंती दुरूस्त करून त्यावर सिवरेज ट्रीटमेंट प्लॅण्ट लावणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नाल्याच्या काठावर हॉकर्स झोन उपलब्ध करून, नाल्याच्या रस्त्याच्या कडेला गार्डन कॅरी तयार करून स्वच्छता व सुंदरता करणे गरजेचे आहे. जी-२० अंतर्गत महापालिका प्रशासनाने आपली नैतिक जबाबदारी समजून हे काम करण्याची गरज आहे. अथवा नॉर्थ कॅनल नावाने असलेल्या लेखा शिर्षाखाली अर्थसंकल्पात तरतूद करून यातून कामे करण्यात यावी. हॉकर्स झोन अंतर्गत जागा उपलब्ध केल्यास असंख्य लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल, स्थानिक नागरीकांचे आरोग्य सुरक्षित राहण्यास मदत होईल.
जीतेंद्र घोडेस्वार, माजी नगरसेवक