नागपूर जिल्ह्यातील वानाडोंगरी, पारशिवनीचा मंगळवारी निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 11:35 PM2018-07-23T23:35:11+5:302018-07-23T23:36:09+5:30
वानाडोंंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगर पंचायतची पहिली सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्या अनुषंगाने मंगळवारी (दि.२४) वानाडोंगरी व पारशिवनी येथे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यासाठी आवश्यक असलेली तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वानाडोंंगरी नगर परिषद आणि पारशिवनी नगर पंचायतची पहिली सार्वत्रिक निवडणूक नुकतीच पार पडली. त्या अनुषंगाने मंगळवारी (दि.२४) वानाडोंगरी व पारशिवनी येथे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यासाठी आवश्यक असलेली तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
या दोन्ही ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी स्वतंत्र मतदान घेण्यात आले. त्यामुळे मंगळवारी नगराध्यक्षांसह नगरसेवकांचा फैसला होणार आहे. वानाडोंगरी येथे गुरुवारी (दि. १९) तर पारशिवनी येथे रविवारी (दि. १५) नगराध्यक्ष व नगरसेवक पदांसाठी मतदान घेण्यात आले. काही तांत्रिक कारणांमुळे वानाडोंगरी येथील पाच बुथवर रविवारी (दि. २२) पुन्हा मतदान घेण्यात आले. त्या पाचही बुथवर सरासरी ६३.३८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पावसाला सकाळपासूनच सुरुवात झाली होती, तरीही मतदारांचा उत्साह कायम होता.
मतमोजणीची व्यवस्था वानाडोंगरी येथील शासकीय आयटीआयमध्ये करण्यात आली असून, तिथे पाच टेबल लावण्यात आले आहेत. मतमोजणीला सकाळी १० वाजता सुरुवात होणार असून, ती दोन राऊंडमध्ये पूर्ण केली जाईल. त्यासाठी १०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पारशिवनी येथील मतमोजणी नगर पंचायतच्या नवीन कार्यालयात करण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी चोख पोलीस बंदाबस्त ठेवण्यात आला आहे.