पाडसाच्या शोधात भटकतेय हरीण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 11:59 AM2021-08-09T11:59:51+5:302021-08-09T12:01:58+5:30
Nagpur News वेळाहरी परिसरात शनिवारी हरणाचे एक जखमी पाडस आढळल्यानंतर आता एक मादी हरीणही पाडसाच्या शोधात भटकत असल्याचे गावकऱ्यांना दिसले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वेळाहरी परिसरात शनिवारी हरणाचे एक जखमी पाडस आढळल्यानंतर आता एक मादी हरीणही पाडसाच्या शोधात भटकत असल्याचे गावकऱ्यांना दिसले. काल सापडलेल्या पाडसाची ती आई असावी, असा अंदाज आहे. ते पाडस सध्या ट्रॅन्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचार घेत आहे.
वेळाहरी, पोद्दार शाळेमागे शनिवारी हरणाचे एक पाडस जखमी अवस्थेत भटकताना दिसून आले. ते एका ठिकाणी विश्रांतीसाठी बसले असता स्थानिक युवक राम शर्मा यांनी पकडून त्याच्यावर प्राथमिक उपचार केले. पाणी पाजले. तसेच वनविभागाच्या सेमिनरी हिल्सवरील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला माहिती दिली. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाडसाला ताब्यात घेतले. सध्या त्याच्यावर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
दरम्यान, रविवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा वाजताच्या दरम्यान एक मादी हरीण वेळाहरीच्या त्याच परिसरात भटकताना आढळली. ज्या ठिकाणी जखमी पाडस बसले होते, त्याच ठिकाणी आणि लगतचा परिसर ती हुंगत असल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. यावरून ती मादी हरीण त्या पाडसाची आई असावी आणि त्याच्या शोधात भटकत असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे.
आई-बाळाची भेट घडवा
स्थानिक नागिरकांनी वनविभागासोबत संपर्क साधून मादी हरीण पाडसाला शोधत असल्याची माहिती दिली. ती त्याची आई असावी, असाही अंदाज वनविभागाकडे कळविला. वनविभागाने शहानिशा करून पाडसाची आई येईल, तेव्हा त्याला सोडावे आणि ताटातूट झालेल्यांची भेट घडवावी, अशी मागणी केली आहे.
...