अण्णाभाऊ साठेंच्या नातसुनेची न्यायासाठी भटकंती
By Admin | Published: December 22, 2015 04:37 AM2015-12-22T04:37:04+5:302015-12-22T04:37:04+5:30
शाहिरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे स्फुल्लिंग चेतविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पणनातीची आठ
मुलीचे अपहरण करून हत्या : पोलिसांकडून आरोपीला अभय
नरेश डोंगरे ल्ल नागपूर
शाहिरीच्या माध्यमातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे स्फुल्लिंग चेतविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पणनातीची आठ महिन्यांपूर्वी हत्या झाली. मात्र, पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीवर कारवाई केलेली नाही. वारंवार प्रयत्न करूनही पोलिसांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने न्याय मिळवून घेण्यासाठी अण्णाभाऊंची नातसून गेल्या आठ महिन्यांपासून भटकंती करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
विशेष म्हणजे, देश-विदेशात गौरवान्वित झालेल्या अण्णाभाऊशी संबंधित (पणतीचे अपहरण करून अतिप्रसंग केल्यानंतर हत्या झाल्याचे) हे प्रकरण पोलीस गंभीरपणे घ्यायला तयार नाही, ही यातील आणखी एक संतापजनक बाब आहे. अण्णाभाऊच्या नातसून लीलाबाई अशोक साठे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागपुरात आल्या. प्रस्तुत प्रतिनिधीशी त्यांची भेट झाल्यानंतर या खळबळजनक प्रकरणात पोलीस प्रशासन साठे कुटुंबीयांसोबत कसे अन्यायपूर्ण वर्तन करीत आहे, त्याची कैफियत लीलाबाई यांनी मांडली.
साहित्याची प्रचंड श्रीमंती मिरवणारे अण्णाभाऊंचे नातू अशोक साठे यांचे कुटुंबीय अद्यापही हलाखीतच जगत आहेत. ते त्यांच्या मूळगावी वाटेगाव (जि. सांगली) येथे राहतात. त्यांची मुलगी सुवर्णा ही ठाणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात कॉन्स्टेबल होती. ४ फेब्रुवारीपर्यंत कार्यरत असलेल्या सुवर्णाला सुनील इंगळे नामक आरोपीने सोबत नेले. त्यानंतर ७ फेब्रुवारीला सुवर्णा भाजल्यामुळे गंभीर अवस्थेत कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल असल्याचा निरोप इस्पितळातून साठे कुटुंबीयांना मिळाला. त्यामुळे लीलाबाई आणि अन्य नातेवाईक रुग्णालयात पोहोचले. तेथे सुनील बाबूराव इंगळे तिच्याजवळ होता. १४ फेब्रुवारीला सुवर्णाचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या आई-वडिलांना कसलीही सूचना न देता इंगळेने सुवर्णावर परस्पर अंत्यसंस्कार केले. सुवर्णाचे अपहरण करून अतिप्रसंगानंतर तिला जाळून मारल्याची तक्रार शोकसंतप्त साठे कुटुंबीयांनी लगेच कासेगाव पोलीस ठाण्यात केली. मात्र पोलिसांनी या गरीब कुटुंबाला न्याय न देता त्यांना टाळणे सुरू केले.एकुलत्या एक कमावत्या मुलीचा असा अंत झाल्यामुळे आणि पोलिसांकडून न्याय मिळत नसल्यामुळे मानसिक धक्का बसल्याने सुवर्णाचे वडील अशोक साठे यांचे निधन झाले. तेव्हापासून सुवर्णाची आई लीलाबाई न्यायासाठी या-त्या अधिकाऱ्याचे, लोकप्रतिनिधीचे उंबरठे झिजवीत आहेत.
इंगळेकडून धमक्या
संपूर्ण कुटुंबीयांसाठी आधार ठरलेली तरुण मुलगी अशा पद्धतीने मारली गेल्यामुळे शोकसंतप्त लीलाबाई न्यायासाठी आक्रोश करीत आहे. तर ती इकडे तिकडे जात असल्यामुळे चिडलेला आरोपी इंगळे आणि त्याचे साथीदार ‘तू थांबली नाही, तर तुला आणि तुझ्या मुलांनाही तसेच जाळून मारेन’,अशी धमकी देत आहे. पोलीस मात्र आपल्या तक्रारीची का दखल घेत नाही आणि इंगळेवर कोणत्या कारणामुळे कारवाई करीत नाही, ते मला कळतच नसल्याचे लीलाबाई म्हणतात. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबातील महिला-मुलीसोबत असे काही घडले असते तर पोलीस प्रशासन असेच वागले असते काय, असा सवालही लीलाबाई करीत आहेत. निर्भयाच्या प्रकरणानंतर महिला-मुलींच्या अत्याचारासंदर्भातील कायदे अधिक कडक झाले. ते आमच्या सुवर्णासाठी लागू होत नाहीत काय, असा केविलवाणा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्र्यांशी भेट कशी होणार?
नागपुरात अधिवेशन सुरू आहे, येथे तरी मुख्यमंत्र्यांची भेट मिळेल, त्यांच्याकडे आपली कैफियत मांडल्यास आपल्याला न्याय मिळेल, अशी आशा बाळगून लीलाबाई सोमवारी नागपुरात पोहोचल्या. अत्यंत गरिबीत जगणाऱ्या लीलाबाई यांनी येथे पोहोचण्यासाठी पैशाची जमवाजमव कशी केली, ते सांगताना त्यांची अवस्था शब्दातीत होती. लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव तडाखे यांच्या मदतीने त्या नागपुरात आल्या खऱ्या, मात्र मुख्यमंत्र्यांना कसे भेटावे, अशी समस्या त्यांना भेडसावत आहे. त्यासाठी त्या इकडे तिकडे फिरत आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांची कशी भेट घेता येईल, असा प्रश्न करीत त्या दिवसभर नागपुरात फिरत होत्या. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात (कॅम्प) जाऊन निवेदनही दिले आहे. एकदा मुख्यमंत्र्यांनी दोन मिनिट आपली व्यथा ऐकून घ्यावी, अशी त्यांची भावना आहे.