रस्त्यांवर फिरणाऱ्या रिकामटेकड्यांचा बंदोबस्त हवाच : पोलिसांनी कारवाई करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 12:46 AM2020-03-29T00:46:48+5:302020-03-29T00:49:05+5:30
देशभरात ‘लॉकडाऊन’ असतानादेखील नागपुरात काही रिकामटेकडे काहीही आपात्कालीन कार्य नसताना रस्त्यांवर फिरताना तसेच घोळका करून गप्पा हाकताना दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’च्या ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांमध्ये वाढ होणे ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. अशा स्थितीत ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखणे अनिवार्य झाले आहे; परंतु देशभरात ‘लॉकडाऊन’ असतानादेखील नागपुरात काही रिकामटेकडे काहीही आपात्कालीन कार्य नसताना रस्त्यांवर फिरताना तसेच घोळका करून गप्पा हाकताना दिसून येत आहेत. अशा सर्व लोकांवर कठोर कारवाई करून पोलिसांनी त्यांच्यातील ‘अतिहुशारी’ बाहेर काढण्याची वेळ आली आहे. असे केले तरच ‘कोरोना’चा खऱ्याअर्थाने संसर्ग टाळल्या जाऊ शकतो.
‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी शुक्रवारी सायंकाळी व शनिवारी दिवसभर शहरातील विविध भागांची पाहणी केली. यादरम्यान अतिशय धक्कादायक बाबी दिसून आल्या. कडेकोट बंदोबस्त असलेले चौक वगळता बऱ्याच ठिकाणी रिकामटेकडे बिनधास्तपणे गाड्यांवर फिरताना दिसून आले. काही जणांना विचारणा केली असता अगदी थातूरमातूर कारणे दिली. प्रत्यक्षात आपात्कालीन सेवेत असणाऱ्यांनीच घराबाहेर निघावे, असे प्रशासनाचे निर्देश आहेत. किराणा, भाजी आणण्यासाठी निघाले तर तेदेखील समजू शकतो. परंतु काहीच काम नसताना एखाद्या मित्राकडे किंवा नातेवाईकाकडे जाण्याचे प्रकार सुरू आहेत.
याशिवाय काही चौकांत तर स्थानिक रहिवासी एकत्रित येऊन गप्पा मारतानादेखील दिसून आले. अशा सर्व लोकांवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे. अशा लोकांना ‘कोरोना’ची लागण होण्याचा सर्वात जास्त धोका असून ते त्याचे वाहक बनू शकतात. त्यामुळे पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
अंतर्गत भागातदेखील ‘पॅट्रोलिंग’ हवे
साधारणत: शहरातील चौक, मुख्य रस्ते येथे पोलीस कर्मचारी तैनात आहेत. परंतु शहरातील गल्लीबोळात मात्र लोक निर्धास्तपणे फिरत आहेत. किराणा दुकान, भाजीच्या ठेल्यांवर गर्दी करत आहेत. गोपालनगरात तर एका ठिकाणी रोज गल्लीत क्रिकेटचे सामने रंगत आहेत. अशा स्थितीत पोलिसांनी अंतर्गत भागातदेखील ‘पॅट्रोलिंग’ वाढविण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
नागरिकांनो, तुम्हीच स्वत:चा जीव वाचवा
‘कोरोना’चे संकट आणखी वाढण्यास सुरुवात झाली आहे. या आजारावर नियंत्रण मिळवायचे असेल तर एकमेकांपासून अंतर राखणे अनिवार्य आहे. मात्र अद्यापही शहरातील अनेक नागरिकांना याची गंभीरता लक्षात आलेली नाही. ‘कुछ नहीं होता’ याच आविर्भावात ते आहेत. मात्र स्वत:चा आणि कुटुंबातील जीवलगांचा जीव वाचविणे हे त्यांच्याच हाती आहे. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत घरीच राहणे हे सर्वांच्या फायद्याचे ठरणार आहे. यासाठी सर्वांनी संयम राखला पाहिजे.
थेट पोलिसांना कळवा
प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवणे हे पोलिसांनादेखील शक्य नाही. अशा स्थितीत तुमच्या सोसायटी, कॉलनी अथवा आजूबाजूच्या भागात कुणी विनाकारण घराबाहेर येऊन गप्पा मारत असतील, ‘सोशल डिस्टन्सिंग’ची गंभीरता राखत नसतील तर थेट पोलीस किंवा प्रशासनाला याची माहिती देऊ शकता. ‘कोरोना’विरोधातील या लढाईत सर्वांनी एकत्रित लढण्याची आवश्यकता आहे.