वसतिगृह बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची भटकंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:11 AM2021-08-18T04:11:53+5:302021-08-18T04:11:53+5:30
नागपूर : कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने वसतिगृहसुद्धा बंद करण्यात आली आत्त. परंतु प्रात्यक्षिक विषय असणारे व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या ...
नागपूर : कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने वसतिगृहसुद्धा बंद करण्यात आली आत्त. परंतु प्रात्यक्षिक विषय असणारे व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना महाविद्यालय प्रशासनाद्वारे एप्रिल महिन्यापासून महाविद्यालयात येणे अनिवार्य केले आहे. या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी समाजकल्याणच्या वसतिगृहात प्रवेशित असून, वसतिगृह बंद असल्याने भाड्याने राहावे लागत आहे. भाड्याने राहणे, खाणे, शैक्षणिक साहित्याचा खर्च करावा लागत असल्याने विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसतो आहे.
शहरातील एका रुग्णालयांमध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण करणाऱ्या ७० ते ८० विद्यार्थिनी समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रवेशित आहेत. कोरोनामुळे वसतिगृह बंद असले तरी ४ महिन्यांपासून त्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू आहे. त्यामुळे ते भाडेतत्त्वावर राहून आपले शिक्षण पूर्ण करीत आहेत. यासंदर्भात त्यांनी समाजकल्याण विभागाला निवेदने दिली आहेत. त्यांना राहणे, खाणे, शैक्षत्क साहित्य आणखी बऱ्याच गोष्टी स्वखर्चाने कराव्या लागतात. विशेष म्हणजे संबंधित महाविद्यालय या विद्यार्थिनींकडून प्रशिक्षणाच्या नावावर १२ तास काम करवून घेत आहे. त्यांना त्या मोबदल्यात कुठलेही मानधन दिले जात नाही.
विद्यार्थ्यांची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांकरिता वसतिगृहे तत्काळ खुली करावी. ४ महिन्यांपासून भाडेतत्त्वावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या रकमेची प्रतिपूर्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. विभागाने यासंदर्भात कुठलेही पाऊल उचलले नाही.
- विद्यार्थ्यांकडून प्रशिक्षणाच्या नावावर कोणतेही मानधन न देता १२ तास काम करवून घेणे हा एक प्रकारचा अन्याय आहे. समाजकल्याण विभागाने चौकशी करून संबंधित महाविद्यालयांवर कारवाई करावी व तत्काळ वसतिगृहे सुरू करून विद्यार्थ्यांना मागील ४ महिन्यांची भाडे रकमेची भरपाई द्यावी.
- आशिष फुलझेले, सदस्य, मानव अधिकार संरक्षण मंच