वणीच्या कोळसा व्यापाऱ्याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक; व्यापारी क्षेत्रात खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2022 01:08 PM2022-03-11T13:08:51+5:302022-03-11T13:23:20+5:30
कोळशाच्या पैशांसाठी वणी आणि चंद्रपूरच्या व्यापाऱ्यांमध्ये वाद सुरू आहेत. बत्राच्या अटकेमुळे वाद सुरू असलेल्या व्यापाऱ्यात खळबळ उडाली आहे.
नागपूर : कोळशाचा पुरवठा केल्यानंतर ८० लाख रुपये परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी वणीच्या व्यापाऱ्याला लकडगंज पोलिसांनीअटक केली आहे.
मनीष शामसुंदर बत्रा (४५, बेलदारपुरा, वणी) असे अटक केलेल्या कोळसा व्यापाऱ्याचे नाव आहे. तो कोळसा आणि गारमेंटचा व्यापार करतो. वर्धमाननगर येथील रहिवासी मित्तल एनर्जीस ऑफ इंडियाचे संचालक नितीन अग्रवाल यांनी २०१६-१७ दरम्यान बत्राच्या एस. बी. ट्रेडर्सला जवळपास एक कोटीच्या कोळशाचा पुरवठा केला होता. हा पुरवठा एका दलालाच्या माध्यमातून केला होता. दलालाच्या माध्यमातूनच देवाणघेवाण ठरली होती. बत्राने अग्रवाल यांना २० लाख रुपये दिले. उर्वरित ८० लाखासाठी तो टाळाटाळ करू लागला.
दलालाने थकीत रक्कम मागितली असता, बत्रा धमकी देत होता. त्याच्यामुळे त्रस्त होऊन दलालाने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर अग्रवाल यांनी बत्राविरुद्ध आर्थिक शाखेत तक्रार दिली. आर्थिक शाखेच्या तपासात बत्राने थकबाकी देण्यासाठी काही दिवसाची सवलत मागितली. ठराविक कालावधीत रक्कम न दिल्यास कारवाईचा सामना करण्यासाठी तो तयार झाला. परंतु आर्थिक शाखेने बत्राला दिलेल्या कालावधीत त्याने रक्कम न दिल्यामुळे अग्रवाल यांनी पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे अग्रवाल यांनी न्यायालयात तक्रार दिली.
न्यायालयाच्या निर्देशानुसार ९ फेब्रुवारीला लकडगंज पोलिसांनी बत्राविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. बुधवारी त्यास वणीवरून अटक करून नागपुरात आणण्यात आले. त्याला न्यायालयासमोर हजर करून, १४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. बत्राविरुद्ध यापूर्वीही फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे. कोळशाच्या पैशांसाठी वणी आणि चंद्रपूरच्या व्यापाऱ्यांमध्ये वाद सुरू आहेत. बत्राच्या अटकेमुळे वाद सुरू असलेल्या व्यापाऱ्यात खळबळ उडाली आहे.