दारुबंदीसाठी बिहारसारखी इच्छाशक्ती हवी

By admin | Published: April 13, 2017 03:07 AM2017-04-13T03:07:46+5:302017-04-13T03:07:46+5:30

दारुबंदीचा कायदा कठोर करून त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. परंतु राज्यशासन दारूचा कमाईचा स्रोत

Want to do Bihar like liquor prohibition | दारुबंदीसाठी बिहारसारखी इच्छाशक्ती हवी

दारुबंदीसाठी बिहारसारखी इच्छाशक्ती हवी

Next

मेधा पाटकर : नशामुक्त भारत राष्ट्रीय संमेलन
नागपूर : दारुबंदीचा कायदा कठोर करून त्याची व्यवस्थित अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. परंतु राज्यशासन दारूचा कमाईचा स्रोत मानत असल्यामुळे दारुबंदीसाठी पुढाकार घेत नाही. त्यामुळे दारुबंदी होण्यासाठी बिहारसारखी राजकीय इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी बुधवारी येथे केले.
नशा मुक्त भारत आंदोलनाच्यावतीने सिव्हील लाईन्स येथील वसंतराव देशपांडे सभागृहात राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले. व्यासपीठावर आर्य प्रतिनिधी सभेचे संयोजक स्वामी अग्निवेश, स्वामिनी दारुबंदी अभियानाचे महेश पवार, ग्राम संरक्षण दलाच्या माया चवरे, गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे विलास भोंगाडे, कोळसा श्रमिक सभेचे दीपक चौधरी, नशामुक्त भारत आंदोलनाचे संयोजक डॉ. सुनीलम, डॉ. सुरेश खैरनार, आमदार बी. आर. पाटील, शाम रज्जक, अ‍ॅड आराधना भार्गव, गौतम बंडोपाध्याय, सदाशिव मगदुम, प्रफुल्ल सामंतराय आदी प्रतिनिधी उपस्थित होते. मेधा पाटकर म्हणाल्या, लोक प्रतिनिधींनी दारुबंदीचा मुद्दा लावून धरणे आवश्यक आहे. दारू हेच महिलांवरील अत्याचाराचे प्रमुख कारण आहे. दारूचे परवाने राजकीय नेते वाटतात. त्यामुळे राजकारणावर दारू माफियांचा प्रभाव मोठा आहे. पंतप्रधान मोदींनी जेथे भाजपचे सरकार आहे, त्या राज्यात तरी किमान दारुबंदी करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आठ टक्के आत्महत्या दारूमुळे झाल्याचे समोर आले आहे. तरुणांमध्येही नशेचे प्रमाण वाढत आहे. दारुबंदीसाठी जनमत चाचणी घ्यावी, या चाचणीत घोळ होऊ नये. हाय वे पासून ५०० मीटरवर दारूचे दुकान असू नये हा शासनाचा निर्णय दारुबंदीतील पळवाट असल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक दीपक चौधरी यांनी केले. संचालन डॉ. सुनीलम यांनी केले. आभार विलास भोंगाडे यांनी मानले. कार्यक्रमाला विविध राज्यातून आलेले नशा मुक्त भारत आंदोलनाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

गाय विकणाऱ्यालाही शिक्षा व्हावी : स्वामी अग्निवेश
सरसंघचालक मोहन भागवत यांनी गोहत्या बंदीची मागणी केली, त्यांच्या मागणीचे स्वागत आहे. केवळ गाय कापणाऱ्यालाच नव्हे तर गाय विकणाऱ्यालाही शिक्षा व्हावी, अशी भूमिका स्वामी अग्निवेश यांनी मांडली. १९६८ पासून लाल किल्ल्यासमोर हातात मशाल घेऊन दारुबंदीचे आंदोलन सुरू केले. त्यासाठी आठ वेळा तुरुंगवास सोसला. अनेकदा जीवघेणे हल्ले झाले. संमेलनात १ मे पासून दारुबंदीचे आवाहन करण्यात येणार आहे. २ आॅक्टोबरपूर्वी देशात दारुबंदी व्हावी, असा प्रयत्न राहणार आहे. गुजरातमध्ये दारुबंदीमुळे महिला सुरक्षित आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दारुबंदीसाठी दीक्षाभूमीवरून रॅली
नशामुक्त भारत आंदोलनाच्या वतीने देशपांडे सभागृहात राष्ट्रीय संमेलनाचे आयोजन करण्यात आले. त्यापूर्वी दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सकाळी १० वाजता रॅली काढण्यात आली. रॅलीत सहभागी महिला, पुरुष, युवकांनी ‘दारुबंदी झालीच पाहिजे’, ‘नशामुक्त भारत आंदोलन जिंदाबाद’, ‘शराब के ठेके तोड दो’ अशा घोषणा देऊन दारुबंदीची मागणी रेटून धरली. दुपारी १२ वाजता रॅलीचा देशपांडे सभागृहात समारोप करण्यात आला.
ग्रामीण भागातील महिलांचा उत्साह
नशामुक्त भारत राष्ट्रीय संमेलनात सहभागी होण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून महिला-पुरुष आले होते. यात सहभागी झालेल्या महिलांमध्ये उत्साह दिसून आला. अनेक महिलांनी स्वयंस्फूर्तीने व्यासपीठावर येऊन दारुबंदीवर गीत सादर करून अनुभवकथन केले. यातील बहुसंख्य पुरुष आणि महिला ग्रामीण भागातील असल्याचे दिसले. त्यामुळे ग्रामीण भागात दारूमुळे किती जणांचे संसार उद्ध्वस्त झाले असतील, याची प्रचिती आली.

Web Title: Want to do Bihar like liquor prohibition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.