आईस गोला खाताय? आधी हे वाचा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 11:15 AM2019-04-15T11:15:34+5:302019-04-15T11:18:03+5:30

आईसगोला, कुल्फी, निंबूसरबत, उसाचा रस आदींमध्ये अखाद्य म्हणजे उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा सर्रास वापर होत आहे. हा बर्फ अमोनिया वायू व दूषित पाण्याद्वारे तयार होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

Want to eat Ice Gola? then Read this before. | आईस गोला खाताय? आधी हे वाचा..

आईस गोला खाताय? आधी हे वाचा..

googlenewsNext
ठळक मुद्देआरोग्य धोक्यातआईसगोला, कुल्फी, सरबतमध्ये सर्रास वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कमी भांडवलात बक्कळ नफा कमवायच्या मोहात काही व्यापाऱ्यांनी अक्षरश: नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे़ शहरात रस्त्यारस्त्यांवर विकल्या जाणारा आईसगोला, कुल्फी, निंबूसरबत, उसाचा रस आदींमध्ये अखाद्य म्हणजे उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या बर्फाचा सर्रास वापर होत आहे. हा बर्फ अमोनिया वायू व दूषित पाण्याद्वारे तयार होत असल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
उपराजधानीचे तापमान ४३ अंशापर्यंत गेले आहे. अंगाची लाही लाही होऊ लागली असताना कोल्डड्रिंक, रसवंती, निंबूशरबत, आइस्क्र ीम व ज्यूस सेंटरवर गर्दी वाढू लागली आहे. एखादा बर्फाचा गोळेवाला अथवा सरबतवाला समोर आला तर त्याची चव चाखल्याशिवाय पुढे जावेसे वाटत नाही. मात्र, रस किंवा अन्य पेयांत टाकण्यात येणारा बर्फाचा खडा कुठून येतो किंवा तो कसा तयार होतो, त्याठिकाणी आरोग्यदायी वातावरण आहे अथवा नाही याची कुणीच खातरजमा करत नाही. शहरात बर्फ तयार करणाऱ्या कंपन्या ‘कूलिंग’साठीच अखाद्य बर्फ तयार करतात. केवळ दोनच कंपन्या ‘आईसक्यूब’ तयार करतात. हा महागडा बर्फ असल्याने याचा वापर मोठे हॉटेल्स, बीअरबार येथेच होतो. कूलिंगसाठी वापरण्यात येणारा बर्फच आपल्याकडे मोठ्या प्रमाणात खाण्यासाठी वापरला जात असल्याचे वास्तव आहे. अखाद्य बर्फ बनविणाऱ्या कंपन्या आपला बर्फ मोठ्या आकाराचा व्हावा व तो फार काळ टिकावा यासाठी अमोनियाचा वापर करतात. त्यांच्या जोडीला विविध वायू आणि दूषित पाणी असते. हा बर्फ दूध, मासे आणि रासायनिक उत्पादनाना थंडावा (कूलिंग) देण्यासाठी तयार केला जातो. या बर्फातील सर्वच घटक आरोग्याच्या दृष्टीने फार घातक असतात, असे असतानाही अन्न औषध प्रशासनाच्या नाकावर टिच्चून औद्योगिक वापरासाठी असलेल्या बर्फाची खाद्यपदार्थ म्हणून विक्री होत आहे.

फूटपाथवर विकला जातो बर्फ
शहरातील अनेक महत्त्वाच्या चौकातील फूटपाथवर सर्रास बर्फाची विक्री होते. बर्फ साठवण्याची ही जागा अत्यंत गलिच्छ असते. बर्फाला ऊन लागू नये म्हणून तो ठेवण्याच्या जागेवर अंथरली जाणारी पोती तसेच बर्फाच्या लाद्यांना गुंडाळली जाणारी पोती अत्यंत घाणेरडी असतात. वितळणाऱ्या बर्फाचे पाणी पोत्याखाली साठून चिखल व नंतर डबके तयार होते. तरी बर्फ दिवसभर त्यातच असतो. हा सगळा प्रकार रोगराई पसरवणारा असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. बहुसंख्य आईस गोलावाले, कुल्फीवाले, निंबू शरबत व उसाचा रसवाले येथून हा बर्फ घेऊन जातात.

Web Title: Want to eat Ice Gola? then Read this before.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य