‘पास’ व्हायचेय? ३५ नव्हे ४० टक्के लागणार
By admin | Published: May 8, 2016 03:14 AM2016-05-08T03:14:47+5:302016-05-08T03:14:47+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध विद्याशाखांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळी टक्केवारी आहे.
नागपूर विद्यापीठ : सर्व अभ्यासक्रमांना एकच योजना लागू करण्यासाठी प्रयत्न
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील विविध विद्याशाखांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळी टक्केवारी आहे. परंतु आता विद्यापीठाने सर्व अभ्यासक्रमांसाठी एकाच योजनेची अंमलबजावणी करण्याचे जवळपास निश्चित केले आहे. यानुसार पदवी परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी ३५ ऐवजी ४० टक्के तर पदव्युत्तर परीक्षेत ५० टक्के गुण मिळविणे अनिवार्य राहणार आहे. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय जाहीर होण्याची चिन्हे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठात विविध प्रकारच्या ९ विद्याशाखा आहेत. प्रत्येक शाखांमधील विविध अभ्यासक्रमांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी वेगवेगळे नियम आहेत. काही अभ्यासक्रमांत ३५ टक्के अनिवार्य आहेत, तर काही ठिकाणी ५० टक्क्यांची अट आहे.
विविध अभ्यासक्रमांमध्ये उत्तीर्ण टक्केवारीत असमानता असल्यामुळे विद्यार्थ्यांकडून अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. शिवाय विद्यापीठ वर्तुळातूनदेखील उत्तीर्ण होण्यासाठी एकच समान योजना असावी, अशी मागणी समोर येत होती. अखेर विद्यापीठातील अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धतीमध्ये बदल करण्याच्या संदर्भात विद्यापीठाने पाऊल उचलले. विद्वत परिषदेने नुकतीच प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. त्यामध्ये सर्व शाखेच्या समन्वयकांचा समावेश आहे. या समितीने विद्यापीठात उत्तीर्ण होण्यासाठी एकच योजना असावी, असे प्रस्तावित केले आहे. यानुसार पदवी अभ्यासक्रमांसाठी ४० टक्के आणि पदव्युतर अभ्यासक्रमासाठी ५० टक्के गुण मिळविणे अनिवार्य राहणार आहे. (प्रतिनिधी)
लवकरच होणार निर्णय
बरेचदा गुणांकन करताना वेगवेगळ्या विषयांसाठी वेगवेगळे निकष लावण्यात येतात. प्रत्येकाचा एक वेगळा अध्यादेश आहे. ही बाब लक्षात घेता समान योजना आणणे आवश्यक आहे. यामुळे परीक्षा प्रणालीत समानता येणार आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे. या समितीची ६ मे रोजी बैठक होणार होती. परंतु काही कारणांनी ती पुढे ढकलण्यात आली. लवकरच याबाबतीत अंतिम निर्णय करण्यात येईल. असे मत प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केले.