आयआयएम नागपूरमधून एमबीए करायचे? मग १४ लाख रु. फी भरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2022 07:30 AM2022-05-06T07:30:00+5:302022-05-06T07:30:02+5:30
Nagpur News नागपुरातील मिहान दहेगाव येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएम) शैक्षणिक वर्ष २०२१-२३ या दोन वर्षांची फी १३.७५ लाख रुपये आहे.
नागपूर : नागपुरातील मिहान दहेगाव येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएम) शैक्षणिक वर्ष २०२१-२३ या दोन वर्षांची फी १३.७५ लाख रुपये आहे. याशिवाय विद्यार्थ्यांना दोन वर्षांसाठी दोन लाख रुपये अतिरिक्त खर्च येतोच. एससी, एसटी, ओबीसी वा अन्य संवर्गातील विद्यार्थ्यांना फीमध्ये सवलत मिळत नाही. त्यांनाही तेवढीच फी भरावी लागते. गरीब वा सामान्य विद्यार्थी एवढी जास्त फी भरून आयआयएममध्ये शिक्षण घेणार कसा, असा प्रश्न या उपस्थित झाला आहे.
आयआयएमच्या पदव्युत्तर पदवीप्राप्त सर्वच विद्यार्थ्याला लाखो रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळते, ही बाब खरी आहे. शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्याला बँक कर्जही देते. त्यानंतरही अनेक गरीब आणि सामान्य विद्यार्थी १३.७५ लाखांच्या सर्वाधिक फी रचनेमुळे मॅनेजमेंट शिक्षणापासून वंचित राहतात. कॉलेज केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयांतर्गत कार्यरत आहे. कॉलेजच्या संचालनासाठी कॉलेजला केंद्र सरकारचा वर्षाला निधी मिळतो. त्यानंतरही विद्यार्थ्यांना सवलत मिळत नसल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
नारी रोड येथील ॲड. संगीता थूल यांना दरवर्षी वाढत असलेल्या आयआयएमच्या फीरचनेची माहिती माहितीच्या अधिकारात प्राप्त झाली आहे. प्रारंभी २०१५-१६ मध्ये कॉलेजची दोन वर्षांची फी दहा लाख रुपये होती आणि २०२१-२३ या शैक्षणिक सत्राची फी १३.७५ लाख रुपये असून, सात वर्षांत ३.७५ लाख रुपयांची वाढ झाली आहे. एवढी वाढ विद्यार्थ्यांच्या आवाक्याबाहेर आहे. फीरचनेसाठी काही नियम आहे का, या प्रश्नावर कॉलेजने उत्तर दिले नाही. ही माहिती सार्वजनिक करता येणार नाही, असे आयआयएम नागपूरचे केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी प्रीती घसाड यांनी सांगितले.