गारेगार आणि गोडशार बर्फाचा गोळा खाताय? आधी हे वाचा..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2022 07:00 AM2022-03-25T07:00:00+5:302022-03-25T07:00:02+5:30
Nagpur News बर्फ गोळा खाणे वैद्यकीयदृष्ट्या शरीरास हानिकारक आहे. बऱ्याच बर्फ कारखान्यात दूषित पाण्यापासून बर्फ तयार करण्यात येते. अशा कारखान्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाने वारंवार तपासणी करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
मोरेश्वर मानापुरे
नागपूर : उन्हाळ्यात शीतपेये अथवा बर्फाचा गोळा घेताना त्यात वापरल्या जाणाऱ्या बर्फाच्या गुणवत्तेबाबत शंका कुणालाच येत नाही. उन्हाची उष्णता शमविण्यासाठी बर्फ गोळा विकणाऱ्या गाड्यांजवळ लहान मोठ्यांची गर्दी पहायला मिळते. परंतु बर्फ गोळा खाणे वैद्यकीयदृष्ट्या शरीरास हानिकारक आहे. बऱ्याच बर्फ कारखान्यात दूषित पाण्यापासून बर्फ तयार करण्यात येते. अशा कारखान्यांची अन्न व औषध प्रशासन विभागाने वारंवार तपासणी करावी, अशी मागणी पुढे आली आहे.
बर्फ गोळ्यात रासायनिक रंगाचा वापर
रासायनिक रंग, निकृष्ट दर्जाचे पाणी आणि सॅकरीनपासून गोळा व आइस कॅन्डी तयार केली जाते. वाढत्या महागाईमुळे यात मिसळणारे उच्च प्रतिचे रंग, साखर बर्फ गोळा विकणाऱ्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. चांगल्या प्रतिचे उत्पादन तयार करताना उत्पादनाचा खर्च वाढतो. त्यामुळेच विक्रेते निम्म दर्जाचा रंग आणि सॅकरीनचा उपयोग करतात. बर्फ गोळ्याच्या स्वरूपात आजार विकत आहोत, याची कल्पना विक्रेत्यांना असते. पण कारवाईअभावी हे व्यवसाय धडाक्यात होतात. शिवाय बर्फाचे गोळे रस्त्यावर विकण्यात येत असल्यामुळे न दिसणारे धुळीचे कण त्यात मोठ्या प्रमाणात मिसळतात. लहानांपासून वयस्क बर्फाचे गोळे खातात आणि पोटाचे आजार ओढवून घेतात.
वापरलेल्या बर्फाचा तहान भागविण्यासाठी उपयोग
बर्फाचा मूळ वापर रुग्णालयांमध्ये औषधांचा अथवा सलाइनचा साठा करण्यासाठी होतो. बर्फाचा सर्वाधिक वापर हा रासायनिक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांमध्ये होतो. विक्रेते वापरलेल्या बर्फाची विक्री करतात. तो शरीरासाठी हानिकारक असतो. बर्फ तयार करण्यासाठी कोणत्या प्रकारचे पाणी वापरले जाते, याचा उल्लेख कारखान्यात दर्शनी भागात करणे बंधनकारक आहे.
परवाना बंधनकारक; अन्यथा पाच लाखांपर्यंत दंड
विभागाच्या नियमानुसार खाद्य बर्फ उत्पादक आणि विक्रेत्यांनी परवाना घेणे बंधनकारक आहे. विनापरवाना व्यवसाय करणाऱ्यांवर कलम ६३ नुसार सहा महिन्यांपर्यंत शिक्षा व पाच लाख रुपये दंडाची तरतूद आहे. दूषित बर्फामध्ये इ-कोलाय या शरीराला घातक असलेल्या विषाणूचे प्रमाण किती आहे, या दृष्टीने विभागातर्फे हॉटेल, रेस्टॉरंट, ज्यूस सेंटर, बर्फाचे गोळे तयार करून विकणाऱ्या विक्रेत्यांची अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे तपासणी करण्यात येणार आहे.
बर्फ कारखान्यांची तपासणी
बर्फ उत्पादकांची बैठक आणि कारखान्यांची तपासणी करण्यात येणार आहे. खाण्यायोग्य बर्फ पांढरा आणि खाण्यायोग्य नसलेला बर्फ निळ्या रंगाचा तयार करावा आणि उत्पादकांनी पाण्याचा अहवाल ठेवावा, अशा सूचना देण्यात आल्या.
अभय देशपांडे, सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग.
अशुद्ध पाण्यापासून तयार केलेला बर्फ शरीरासाठी घातक
अशुद्ध पाण्यापासून तयार केलेल्या बर्फामुळे पोटाचे विकार, कावीळ, डायरिया आणि संसर्ग होऊ शकतो. या आजाराचे प्रमाणात उन्हाळ्यात वाढते. लग्नात बर्फ टाकलेले पाणी पिऊ नये. रस्त्यावर बर्फमिश्रित रस आणि अन्य पदार्थ खाऊ नयेत.
डॉ. प्रसाद वरर्दळकर