गोव्याला जायचयं...., नो प्रॉब्लम, नागपूर - मडगाव - नागपूर एक्सप्रेसला मुदतवाढ
By नरेश डोंगरे | Published: November 5, 2024 11:51 PM2024-11-05T23:51:04+5:302024-11-05T23:51:31+5:30
पर्यटकांना गोव्याचे विशेष आकर्षण असते. त्यात कमी पैशात गोव्याची सफर करायची म्हटले तर नागपूर विदर्भातील नागरिकांची रेल्वे गाडीलाच पसंती दिली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर -विदर्भातून थेट गोव्याची सफर करण्याच्या तयारीत असलेल्या रेल्वे प्रवाशांसाठी खूष खबर आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने नागपूर-मडगाव-नागपूर या रेल्वे गाडीची मुदत वाढली आहे. त्यामुळे पुढच्या २९ डिसेंबरपर्यंत जाण्याच्या २६ आणि येण्याच्या २६ अशा एकूण ५२ फेऱ्या ही गाडी लावणार आहे.
पर्यटकांना गोव्याचे विशेष आकर्षण असते. त्यात कमी पैशात गोव्याची सफर करायची म्हटले तर नागपूर विदर्भातील नागरिकांची रेल्वे गाडीलाच पसंती दिली जाते. कारण खिशाला परवडेल अशा प्रवास भाड्यात रेल्वे गाडी गोव्याला नेऊन सोडते. नागपूरहून थेट गोव्याला जाण्यासाठी आणि तेथून परत येण्यासाठी नागपूर-मडगाव-नागपूर ही रेल्वेगाडी आहे. आठवड्यातून दोन वेळा ती उपलब्ध असते. या गाडीची मुदत आता संपणार होती. मात्र, या गाडीला मिळणारा प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता गाडी नंबर ०११३९ नागपूर मडगाव द्वी साप्ताहिक स्पेशल ट्रेन बुधवारी आणि शनिवारी २८ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक ०११४० मडगाव -नागपूर द्वी साप्ताहिक स्पेशल ट्रेन दर मंगळवारी आणि रविवारी २९ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.