फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करायचेय! बावनकुळेंचे विधान, राजकीय चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 05:37 AM2022-12-19T05:37:51+5:302022-12-19T05:38:31+5:30
बावनकुळे यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे विधान केल्यानंतर शिंदे गटात कुजबुज सुरू झाली आहे.
नागपूर : सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असून त्याआधीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्याचे विधान केल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. एकीकडे फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात येणाऱ्या निवडणुका लढविण्याचे वक्तव्य केले होते तर आता बावनकुळे यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे विधान केल्यानंतर शिंदे गटात कुजबुज सुरू झाली आहे.
संत जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळ्याच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीतच बावनकुळे यांनी हे वक्तव्य केले. बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्राचं भविष्य केवळ देवेंद्र फडणवीस बदलू शकतात. फडणवीस हे जाती-पातीच्या पलीकडे गेलेले नेते आहेत. २०२४ मध्ये फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करू, असे सुतोवाच त्यांनी केले. किमान मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत, असे ते म्हणाले.
भाजप कार्यकारिणी, कोअर कमिटीची आज बैठक
- भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची तसेच कोअर कमिटीची बैठक सोमवारी नागपुरात होणार आहे.
- या बैठकांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे प्रभारी सी. टी. रवी, राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित राहतील. सुरुवातीला प्रदेश कार्यकारिणीची बैठक होईल. त्यानंतर सायंकाळी कोअर कमिटीची बैठक होणार आहे.