वंदनाने कापली नस, अंकिता झाल्या वेड्या
By admin | Published: December 13, 2014 03:01 AM2014-12-13T03:01:09+5:302014-12-13T03:01:09+5:30
जीवनभराची कमाई तिप्पट पैसे मिळणार असल्याने के.बी.सी. कंपनीत गुंतविले. काही दिवसातच कंपनीचे संचालक पैसे घेऊन फुर्र झाले. लाखो रुपये हातचे गेल्यामुळे ठेवीदार हैराण झाले.
दयानंद पाईकराव नागपूर
जीवनभराची कमाई तिप्पट पैसे मिळणार असल्याने के.बी.सी. कंपनीत गुंतविले. काही दिवसातच कंपनीचे संचालक पैसे घेऊन फुर्र झाले. लाखो रुपये हातचे गेल्यामुळे ठेवीदार हैराण झाले. यातील नाशिकच्या वंदना आहेर हिने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केला तर गोडखा ता. घनसावंगी जिल्हा जालनाच्या अंकिता ढेरे (६०) यांना हा धक्काच असह्य झाल्यामुळे त्या वेड्यासारख्या वागत होत्या. एक नव्हे तर तब्बल आठ हजार कुटुंबं या कंपनीमुळे हादरलेली आहेत.
केबीसी कंपनीने दोन वर्षात तिप्पट पैसे देण्याचे आमिष दाखविल्यामुळे अनेक ठेवीदार या कंपनीकडे आकर्षित झाले. त्यांनी आपल्या जीवनाची कमाई या कंपनीत जमा केली. संचालक भाऊसाहेब चव्हाण आणि आरती चव्हाण गाशा गुंडाळून पळून गेल्याचे कळताच आठ हजार कुटुंबीयांच्या पायाखालची वाळूच घसरली. नाशिकच्या वंदना बंडू आहेर (३२) यांनी तर कंपनीत २५ लाखाची गुंतवणूक केली होती. त्यांचे पती सुतारकाम करतात आणि त्या मजुरी करतात. त्यांनी जीवनभराची कमाई आणि अंगावरील सोन्याचे दागिने मोडून कंपनीत पैसे भरले. कंपनीने गाशा गुंडाळल्याचे कळताच त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला. घरात कुणी नसताना त्यांनी आपल्या डाव्या हाताची नस कापली. बराच रक्तस्राव झाल्यामुळे त्या बेशुद्ध पडल्या. अगदी वेळेवर त्यांची जाऊबाई आल्यामुळे त्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे त्यांचे प्राण वाचू शकले. परंतु मोठा मुलगा अमितचे शिक्षण बारावीनंतर बंद झाल्याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे जाणवत होती. पैसे गेल्यामुळे घरात सर्वांच्या मनावर मानसिक ताण असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या सारख्याच अंकिताबाई नायबराव ढेरे (६०) रा. गोडखा ता. घनसावंगी जि. जालना या महिलेने सुद्धा पाच लाखाची रक्कम कंपनीत गुंतवली होती. रक्कम घेणारी कंपनी फसवी असल्याचे समजल्यानंतर त्यांचा मनावरील ताबा सुटून त्या वेड्यासारख्या वागत होत्या. त्यांना मानसोपचारतज्ज्ञांकडे उपचार दिल्यामुळे त्या कशाबशा सावरल्या आहेत. परंतु अद्यापही त्यांच्या मनावर ताण असल्यामुळे त्यांना स्पष्टपणे बोलताही येत नव्हते. वंदना आणि अंकिताबाई यांच्यासारख्या अनेकांचे संसार केबीसीच्या लाटेत उघड्यावर आले आहेत. हिवाळी अधिवेशनात शासन मागण्यांची दखल घेऊन जीवनाच्या उर्वरित आयुष्यात कामी येणारी रक्कम देईल या आशेपोटी सर्वजण मोर्चात सामील झाले आहेत.