विकायचे होते फ्रीज, आरोपीने ५.१० लाख केले सिझ
By दयानंद पाईकराव | Published: July 29, 2023 06:06 PM2023-07-29T18:06:51+5:302023-07-29T18:07:24+5:30
बजाजनगर पोलिसांत गुन्हा दाखल
नागपूर : फ्रीज आणि सोफा विकायचा असल्याची जाहिरात ओएलएक्सवर टाकणे एका महिलेला चांगलेच महागात पडले. सायबर गुन्हेगाराने या महिलेच्या खात्यातील ५.१० लाख रुपये आपल्या खात्यात वळवून फसवणूक केली.
स्मिता प्रभास विश्वास (वय ३१, रा. दर्डा मार्ग, रहाटे कॉलनी) यांना आपल्या घरातील जुने फ्रीज आणि सोफा विकायचा होता. त्यांनी गुरुवारी २७ जुलैला दुपारी दोन वाजता ओएलएक्सवर त्याची जाहिरात टाकली. आरोपी मोबाईल क्रमांक ८५०९२८००५० याने स्मिता यांना फोन करून मला सोफा आवडल्याचे सांगितले. त्यानंतर आरोपीने फोन बंद करून दुसऱ्या दिवशाी स्मिता यांना फोन केला. मी तुम्हाला फोन पे द्वारे पैसे पाठवितो तुम्ही मला ६० रुपये पाठवा, असे सांगितले. स्मिता यांनी आरोपीला ६० रुपये पाठविले असता आरोपीने त्यांच्या खात्यातून १ लाख १ हजार ९९ रुपये काढून घेतले.
पैसे गेल्याचे समजताच स्मिता यांनी आरोपी मोबाईल धारकाला फोन करून पैसे परत मागितले असता आरोपीने ९ हजार रुपये पाठविल्यास पूर्ण पैसे परत करतो, अशी बतावणी केली. त्यामुळे स्मिता यांनी पुन्हा आरोपीला ९ हजार रुपये पाठविले असता आरोपीने त्यांच्या खात्यातून ९९ हजार ९९९ रुपये अशी दोन वेळा रक्कम काढून त्यांची ५ लाख १० हजार १५४ रुपयांनी ऑनलाईन फसवणूक केली. स्मिता यांनी दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपी मोबाईल धारकाविरुद्ध कलम ४२०, सहकलम ६६ (क) आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे.