उपचारासाठी सुट्टी हवी असेल तर कुत्रा पिसाळला होता हे सिद्ध करा
By नरेश डोंगरे | Published: February 9, 2023 03:34 PM2023-02-09T15:34:01+5:302023-02-09T15:41:51+5:30
'ते' प्रमाणपत्र आणा; अजब-गजब पत्रामुळे कुत्र्यांची दहशत गडद
नरेश डोंगरे
नागपूर : तुम्ही सरकारी नोकरीत असाल, तुम्हाला कुत्रा चावला असेल आणि उपचारासाठी तुम्हाला सुटी हवी असेल तर तुम्हाला आधी प्रमाणपत्र सादर करावे लागेल. पिसाळलेल्या कुत्र्याने तुम्हाला चावले आहे, असे प्रमाणपत्र सादर केले तरच तुम्हाला सुटी मिळू शकते. ते प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल तर तुमचा सुटीचा अर्ज नामंजूर होऊ शकतो.
होय, खरे आहे, प्रकरण गोंदियातील आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याला कार्यालयीन अधीक्षकाने सुटीच्या संबंधाने नुकतेच तसे पत्र दिले असून, त्या पत्राची प्रत दोन दिवसांपासून सर्वत्र व्हायरल होत आहे. त्यामुळे कुत्र्यांची दहशत अधिक गडद होऊ लागली आहे.
जिथे कुणी जायला बघत नाही, तेथे पोलीस जातात. तेथे विंचू आहे, साप आहे की दुसरा कोणता प्राणी याची ते अजिबात पर्वा करत नाही. त्यामुळे अनेकांना प्रसंगी दुखापतही होते. रात्री बेरात्री गस्तीवर असताना मोकाट कुत्रे मागे लागतात. अनेकदा ते पोलिसांना चावतातही. अशाच प्रकारे गोंदिया पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला पाच दिवसांपूर्वी कुत्रा चावला. त्याची गंभीर जखम बघता डॉक्टरांनी त्याला उपचार आणि आरामाचा सल्ला दिला. परिणामी या पोलीस कर्मचाऱ्याने विशेष रजेसाठी रितसर अर्ज केला. त्याच्या रजेच्या अर्जाला गोंदिया जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयीन अधीक्षकांनी काहीसे रंजक उत्तर दिले.
या उत्तर-कम-पत्रात त्यांनी स्पष्ट केले की, 'कर्तव्यावर असताना राज्य शासनातील एखाद्या कर्मचाऱ्याला पिसाळलेल्या श्वानाने दंश घेतला असेल तर त्याला उपचारासाठी विशेष रजा देय (मंजूर) आहे. मात्र तुम्हाला चावलेला कुत्रा पिसाळला होता की नाही, ते या विनंती अर्जातून स्पष्ट होत नाही. त्यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र (पिसाळलेला कुत्रा चावल्याचे) सोबत जोडलेले नाही', असे म्हणत त्या कर्मचाऱ्याचा सुट्टीचा अर्ज कार्यालय अधीक्षकांनी परत केला आहे. या पत्राची प्रत राज्यातील पोलीसच नव्हे तर सर्व सरकारी विभागाच्या कर्मचाऱ्यात झपाट्याने व्हायरल होत आहे. त्यामुळे कुत्र्याची दहशत अधिकच गडद होऊ लागली आहे.
अशीही एक कमेंट !
या पत्रासोबत वेगवेगळ्या कमेंटही व्हायरल होत आहेत. त्यातील एकाची कमेंट अशी आहे... कुत्रा तुम्हाला चावला तर लगेच त्याला पकडा. त्याला जागेवरच विचारा ...! नाही, तर कुत्र्याला दवाखान्यात घेऊन जा. आधी त्याची तपासणी करा (तो पिसाळला आहे की नाही म्हणून!) नंतर स्वत:चा ईलाज करा. त्यानंतरच सुटीचा अर्ज सादर करा!