'वक्फ बोर्डाच्या जमिनी मूळ मालकांना परत मिळाव्या'; चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2024 11:02 PM2024-06-15T23:02:40+5:302024-06-15T23:10:36+5:30
Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना मुस्लिमांची ५१% मते मिळाली, मविआ केंद्र सरकारच्या योजना बंद पाडणार असल्याचा दावाही बावनकुळे यांनी केला.
Chandrashekhar Bawankule ( Marathi News ) : वक्फ बोर्डाने तात्कालीन कायद्याचा आधार घेत किंवा वक्फचा वापर करून हिंदू, आदिवासी व खासगी जमिनीवर अतिक्रमण केले. त्या जमिनी वक्फ बोर्डाच्या नावाने करून घेतल्या. अशा सर्व जमिनींबाबत तातडीने योग्य ती कारवाई करून त्या ज्या व्यक्ती, मंदिर किंवा संस्थांच्या मालकीच्या आहेत त्यांना त्या परत कराव्यात. त्यासाठी रेकॉर्ड दुरुस्त करावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
वक्फ बोर्ड कायद्यात तातडीने दुरुस्ती करावी. त्यासाठी उच्च स्तरीय समिती किंवा प्राधिकरण गठित करावे व त्यासाठी लागणारा पैसा सरकारने खर्च करावा, असेही बावनकुळे म्हणाले. चंद्रशेखर बावनकुळे नागपूर येथील पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी ही मागणी केली.
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मतदानानंतर बुथ लेव्हलवरून जो रेकॉर्ड मिळाला त्यानुसार उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या मतदानापैकी ५१% वाटा हा मुस्लिम मतदारांचा आहे. मागील दोन अडीच वर्षांत त्यांनी जी हिंदुत्व विरोधी भूमिका स्वीकारली त्या भूमिकेतून हे मतदान मिळाल्याचा अभिमान त्यांना असेल तर ते त्यांना लखलाभ असो. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अशा प्रकारचे उद्धव ठाकरेंचे कर्तृत्व पाहून वाईट वाटत असेल. बाळासाहेबांच्या विचारांसोबत मोठा दगा-फटका होत आहे, असंही बावनकुळे म्हणाले.
वक्फ कायद्याचा गैरवापर करून अनेक हिंदूंच्या जमिनी, आदिवासींच्या जमिनी, मागासवर्गीयांच्या जमिनी, अनेक मंदिरांच्या जमिनी, अनेक खाजगी जमिनी, अनेक सरकारी जमिनी बेकायदेशीररित्या अतिक्रमित करण्यात आलेल्या आहेत. आम्ही सरकारकडे मागणी केली आहे की, तातडीने योग्य ती कारवाई करून त्या जमिनी… pic.twitter.com/H3BAytVTYt
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) June 15, 2024
जनता काँग्रेस कार्यालयापुढे रांग लावणार
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाविकास आघाडीतील घटक दल थोड्याशा यशाने हुरळून गेले आहेत. महायुती आणि मविआच्या मतांमध्ये केवळ ०.३ टक्के फरक आहे. याचमुळे त्यांना मुख्यमंत्रीपद आपल्याला मिळावे यासाठी उत्साह आला आहे. पाच मुख्यमंत्री महाविकास आघाडीकडे जाहीर झालेले आहेत. पुढील पाच वर्षात मोदी सरकारच्या योजना महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेपर्यंत पोहोचाव्यावा यासाठी केंद्रात आणि राज्यात एकच सरकार आवश्यक आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले तर केंद्रातील एनडीए सरकारच्या सर्व योजना बंद करणे हा एकच अजेंडा असेल. त्यामुळे मविआला महाराष्ट्र मतदान करणार नाही. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने खोटे बोलून जाहीर केलेले ८५०० रुपये मागण्यासाठी जनता काँग्रेस कार्यालयासमोर रांगा लावतील असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.
खासदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत बावनकुळे म्हणाले की, समाजात कोणत्याही प्रकारची कुठेही तेढ निर्माण होणार नाही यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम्ही सर्व काम करीत आहोत. दंगली घडविण्याचे काम महाराष्ट्रात शरद पवारांच्या तर देशात काँग्रेसच्या काळात झाले आहे. भाजपाच्या काळात दंगली होत नाहीत तसा विचारही कुणी करीत नाही, असंही बावनकुळे म्हणाले.